
अकोला : पॅसेंजर ऐवजी मेमू लवकरच सेवेत!
अकोला : कोरोना काळापासून पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. त्या सुरू करण्याची प्रवाशांकडून मागणी होत असली तरी रेल्वे प्रशासन पॅसेंजर येवजी मेमो रेल्वे गाड्या प्रवाशांच्या सेवेत सुरू करणार आहे. त्यामुळे यानंतर प्रवाशांना पॅसेंजर येवजी मेमो मध्ये प्रवास करता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी दिली.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक लाहोटी यांनी रविवारी सायंकाळी अकोला रेल्वे स्थानकांचा दौरा केला. महाव्यवस्थापकांची विशेष रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पोहचली. त्यांच्यासोबत १२ ते १४ कर्मचाऱ्यांसह इतरांचा ताफा अकोला रेल्वे स्थानकावर दाखल होताच त्यांनी येथील कामाचा आढावा घेतला. कोरोना पूर्वी अकोला स्थानकावरून भुसावळ-वर्धा, भुसावळ-नागपूर आणि भुसावळ-नरखेड अशा तीन पॅसेंजर धावत होत्या. या गाड्या अजून सुरू झालेल्या नाही. त्यामुळे वेळेवरच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पण १२ डब्याच्या पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा अद्याप रेल्वे प्रशासनाचा विचार नाही. पॅसेंजरच्या रचनेमुळे लहान स्टेशन घेताना तिला गती पकडायला वेळ लागतो. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसाठी यापुढे मेमो उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना पूर्वी धावणाऱ्या मेमो सुरू झाल्या आहेत. नवीन मेमोसाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतरच प्रवाशांच्या सेवेत येतील, असे या वेळी महाव्यवस्थापक लाहाेटी यांनी स्पष्ट केले. यामुळे आता प्रवाशांना जवळच्या प्रवासासाठी मेमो ट्रेन सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
व्यापाऱ्यांच्या सोयींसाठी लवकरच उपायोजना, सीसीटिव्ही सुविधा वाढवणार, रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यावर काम, दोन लिफ्ट, दोन एक्सलेटर लवकर कार्यान्वित, प्लॅटफॉर्म चार- पाच कनेक्शन व एकच्या पुनर्निंमितीवर भर देण्यात येणार आहे.
पार्किंगची समस्या सोडवण्याचे आदेश
अकोला रेल्वे स्टेशन येथे पार्किंगसाठी योग्य सुविधा नाही. रेल्वे आल्यानंतर ऑटोरिक्षापासून सर्व प्रवासी वाहन मुख्य रस्त्यावर गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होते. लहान-मोठे अपघात होतात. उपलब्ध पार्किंग कायम फुल्ल असते. त्यामुळे रस्त्यावर गाड्या पार्क करण्यात येतात.
Web Title: Railway Department Start Memo Trains Instead Of Passenger Trains
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..