
अकोला - कोरोना मुक्त झालेल्या अकोला जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आढलेला हा चौथा रुग्ण आहे. शुक्रवारी आढलेला रुग्ण महानगरपालिका हद्दीतील असल्याने अकोला शहरातील नागरिकांची चिंता वाढले आहे. गेले काही दिवसांत संसर्ग संशयितांच्या चाचणीचे प्रमाणही वाढले आहे.
शुक्रवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १८८ अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून, हा रुग्ण महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे. तीन दिवसांत आढलेला हा चौथा रुग्ण आहे.
काळजी वाढली, दक्षता घ्या!
गेले दोन महिन्यांपासून अकोला शहर व जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस दोन रुग्णांची नोंद झाली. २० दिवसांपूर्वी संसर्ग झालेल्या या दोन रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाल्यानंतर जूनमध्ये आतापर्यंत चौघांचे अहवाल पाझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. परिणामी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मास्क वापरणे ठरेल हिताचे!
अकोला जिल्ह्यात व शहरातील वातावरण मॉन्सूनपूर्व पावसामुळे संसर्गजन्य आजारासाठी पोषक झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे हिताचे ठरणारे आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागानेही माक्स वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अद्याप कुठेही मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.