esakal | अकोल्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार!
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir-.jpg

इंजेक्‍शनची चढ्या भावाने विक्रीची भीती ः अनुचित प्रकार आढळल्यास होणार कारवाई 

अकोल्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार!

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला  ः अत्यवस्थ कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर या ऍण्टी व्हायरल औषधाची मागणी आणि पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाच हजार 400 रुपये अधिकृत किंमत असलेल्या या औषधासाठी राज्यातील महानगरात तब्बल 30 ते 40 हजार रुपयांने विक्री होत असून, अकोल्यातही त्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. 

ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर या औषधाची मात्रा लागू पडत असल्याची निरीक्षणे अनेक ठिकाणी नोंदविली गेल्यानंतर त्याचा उपचारासाठी वापर सुरू झाला आहे. 1 जून रोजी औषध आयात करण्यास आणि विक्रीस केंद्र सरकारने परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात भारतात या औषधाचे उत्पादन करून ते निर्यात करणाऱ्या काही कंपन्यांकडून औषधाचा पुरवठा केला जात होता. सध्या 100 एमजीची एक कुपी (व्हाईल) अनुक्रमे चार हजार, साडेचार हजार आणि साडेपाच हजार रुपयांना उपलब्ध होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांच्या हाती सर्रास त्या औषधाची चिठ्ठी डॉक्‍टरांकडून दिली जात आहे. परंतु, बाजारात औषधच उपलब्ध नसल्याने या नातेवाइकांची प्रचंड धावपळ होत आहे. त्याचाच गैरफायदा घेत काळाबाजार सुरू झाला आहे. त्यामुळे औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांची माहिती घेवून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सर्वोपचारमध्ये रेमडेसवीरचा पुरवठा 
रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ नये यासाठी हे औषध थेट रुग्णालयांनाच देण्याचा निर्णय झाला असून, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाकडे हे औषध पोहचले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

अकोल्यात पोहचले होते 96 व्हाईल 
अकोल्यातील एका शासकीय औषधी विक्रेत्याने 96 व्हाईलची खरेदी केली होती. त्याने ती ठाणे येथील शासकीय रुग्णालयाला विक्री केली असल्याची माहिती आहे. तर शहरातील एका मोठ्या हॉस्पीटलनेही सहा व्हाईलची मागणी रुग्णांच्या नावावर केली असून, ती रुग्णाला देण्यात आली असल्याची माहिती आहे. 

ही औषध मागविणाऱ्या औषध विक्रेत्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या औषधाचा कोणीही काळा बाजार करू नये, यावर विभागाचे लक्ष आहे. चढ्या भावात विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 
-हेमंत मेटकर, सहाय्यक आयुक्त, औषध विभाग, अकोला