राखीव जागांच्या तुलनेत अधिक अर्ज; यंदाही प्रवेशासाठी पालकांची ‘परीक्षा’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE Admission

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एक मार्चपासून सुरु

RTE Admission : राखीव जागांच्या तुलनेत अधिक अर्ज; यंदाही प्रवेशासाठी पालकांची ‘परीक्षा’!

अकोला - आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एक मार्चपासून सुरु झाली आहे. त्यानुसार मोफत प्रवेशासाठी सहा दिवसात २ हजार २४ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले आहेत. सहा दिवसातच अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने १७ मार्चपर्यंत सदर संख्येत आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान जिल्ह्यातील १९० शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली असून संबंधित शाळांमध्ये आरटीईच्या एक हजार ९४६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठी पालकांची परीक्षा होणार आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान २०२३-२४ शैक्षणिक वर्षात आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, पालकांना यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक मार्चपासून सुरु झालेल्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेत सहा दिवसातच दोन हजार २४ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोफत प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया १७ मार्चपर्यंत चालणार असल्याने शेवटच्या दिवसा अखेर अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक वाढू शकते.

अशी आहे स्थिती

  • नोंदणीकृत खासगी शाळा - १९०

  • राखीव जागा - १९४६

  • रविवारपर्यंत प्राप्त अर्ज - २०२४

साईट स्लो झाल्यास पुन्हा प्रयत्न करा

आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन साईट स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.