बियाणे, खते, किटकनाशके शेतकऱ्यांच्या बांधावर

अंमलबजावणीचे पालकमंत्र्यांचे निर्देश ः खरीप हंगामात चार लाख ७१ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन
बियाणे, खते, किटकनाशके शेतकऱ्यांच्या बांधावर

अकोला ः खरीप हंगाम २०२१ करीता जिल्ह्यात चार लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाखाली दोन लाख ९१०० हेक्टर क्षेत्र असून, कापूस Cotton पिकाखाली एक लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व वाजवी दरात तसेच थेट बांधावर बियाणे, खते, किटकनाशके इ. कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू Bacchu kadu यांनी यंत्रणेस दिले. Seeds, fertilizers, pesticides on farmers' bunds

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या खरीप नियोजन बैठकीस विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत, महाबीज विभागीय व्यवस्थापक जगदिशसिंग खोकड, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेराणीया आदी अधिकारी सहभागी झाले होते.

आ. गोवर्धन शर्मा यांनी शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचा पुरवठा व्हावा, त्यादृष्टीने खरीप हंगामाचे नियोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आ. रणधीर सावरकर यांनी पीक कर्ज वाटप व पीक विमा या संदर्भात शेतकऱ्यांना तत्काळ सुविधा पुरविण्याची मागणी केली. आ. अमोल मिटकरी यांनी सोयाबीनच्या बियाण्यांचा पुरवठ्याबाबत, कपाशी वरील बोंड अळी रोखण्यासाठीच्या काय उपाययोजना केल्या आहेत, खताची साठेबाजी रोखण्यासाठी तसेच थेट बांधावर खते पोहोचविण्याबाबत नियोजन करावे असे मुद्दे मांडले. पालकमंत्री कडू यांनी शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसुत्री कार्यक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावात कृषी सेवक हजर असले पाहिजे यासाठी कृषी सेवकांचे कार्यक्रम जाहीर करा. तसेच खते बियाणे यांच्या वाजवी दरात उपलब्धतेबाबतही प्रशासनाने नियोजन करुन दरांवर नियंत्रण ठेवावे.कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी कापूस लागवड ही एक जून नंतर होणे अपेक्षित आहे. त्यासाठी बियाण्यांचे वितरणही एक जून नंतर करावे, अशी सुचनाही करण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रचार व प्रसार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

असे असेल पिक निहाय क्षेत्र

पिकनिहाय क्षेत्र - सोयाबीन- दोन लाख ९१०० हेक्टर, कापूस एक लाख ४७ हजार हेक्टर, तूर ५१ हजार २०० हेक्टर, मूग-३५ हजार १५० हेक्टर, उडीद- १६ हजार १२५ हेक्टर, ज्वारी-८७०० हेक्तर, मका २८५ हेक्टर, असे जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन आहे.

बियाणे उपलब्धतेचा आढावा

सोयाबीन पिकासाठी एक लाख ५६ हजार ८२५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३२ हजार २९९ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. त्यापैकी २८ हजार क्विंटल महाबीज व कृभको मार्फत तर खाजगी उत्पादकांकडून ५९९९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तर शेतकऱ्यांकडे एक लाख ६७ हजार १५६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. कापूस पिकासाठी ३६७५ क्विंटल (७ लाख ३५ हजार पाकिटे) बियाणे लागणार असून हा पुरवठाही खाजगी उत्पादकांकडून ३६६६ व्किंटल तर महाबीज कडून नऊ क्विंटल बियाणे उपलब्धता होणार आहे. तूर पिकासाठी २६८८ क्विंटल बियाण्याची मागणी असून महाबीज मार्फत २१०० क्विंटल महाबीज तर खाजगी उत्पादकांकडून ५८८ क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार आहे.

मुबलक खतसाठा

जिल्ह्यात ९५ हजार ७०० मेट्रीक टन खतांची मागणी असून जिल्ह्याला ७७ हजार ९९० मेट्रीक टन आवंटन मंजूर आहे. गत वर्षीचे १८ हजार ६९६ मेट्रीक टन खत शिल्लक असून खतांचे आवंटन उपलब्ध होत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com