Akola News | बचतगट उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारणार! बच्चू कडू यांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगट उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारणार! बच्चू कडू यांची घोषणा

बचतगट उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारणार! बच्चू कडू यांची घोषणा

अकोला : महिलांच्या उद्यमशिलतेला चालना देण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. स्वयंसहायता बचतगटांमधून महिला अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करतात, अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र मॉल उभारु, ज्यात केवळ महिलांच्या बचतगटांनी उत्पादित केलेली उत्पादने विक्री केली जातील, अशी घोषणा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे केली.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास पालकमंत्री कडू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. विलास भाले हे होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, महिला आर्थिक विकास महामंडळ अकोलाच्या समन्वयक वर्षा खोब्रागडे, अधिष्ठाता कृषी डॉ. ययाती तायडे, अधिसभा सदस्य विठ्ठल सरप पाटील, मोरेश्वर वानखडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विज्ञान केंद्र यांच्या विविध प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन शेतीपूरक उद्योग करणाऱ्या उद्यमशील महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन संजीव सलामे यांनी केले.

महिलांचा सन्मान

या कार्यक्रमात नंदाताई शंकरराव पिंपळशेंडे (रा. वेडली जि. चंद्रपूर), कल्पना विजय दामोदर (रा. सुनगाव ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा), लताताई संतोष देशमुख (रामनगर ता. रिसोड), वंदना देविदास धोत्रे (रा. विवरा ता. पातूर), क्षिप्रा मानकर (अमरावती), प्रतिभा प्रभाकर चौधरी (रा. नवेगाव जि. गडचिरोली), छायाताई विलास कुइटे (रा. बेलखेड ता. तेल्हारा), सिंधुताई निर्मळ (रा. भेंडवळ ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा), इंदिरा कांबळे (रा. कोली ता बाभुळगाव जि. यवतमाळ), विमल गोरे (रा. सोनखास जि. वाशिम), भावना भोजराज भाकडे (रा. वर्धा), प्रीती मधुकर ढोबाळे (रा. उमरी ता. कारंजा जि. वर्धा) या महिलांना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी महिला बचतगटांनी तसेच आत्मा मार्फत प्रशिक्षित महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन सुद्धा पालकमंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे

दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र म्हणजेच ई- ट्रायसिकल वाटप हे दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी राबविण्यात येत आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून दिव्यांगांच्या विकासासाठी वेगळे धोरण, संकल्पना आकारास येईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे केले. महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ११९ ट्रायसिकल अर्थात फिरते विक्री केंद्र दिव्यांगांना वाटप करण्यात आले होते. या दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० ट्रायसिकल वितरण करण्यात येत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. याच कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांच्या स्वयंसहायता बचतगटांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरण करण्यात आले.

Web Title: Self Help Group Products Sale Build A Mall Announcement Of Bachchu Kadu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..