तीन दिवसांत सात गुन्हेगार हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोळी हद्दपार

तीन दिवसांत सात गुन्हेगार हद्दपार

अकोला - तीन दिवसांत जिल्ह्यात एकूण सात गुन्हेगारांवर हद्दापारीची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगार विठ्ठल पंजाबराव मेहेंगे (२७), देवानंद पंजाबराव मेहेंगे (२४), अविनाश बाळकृष्ण मेहेंगे (२१) सर्व रा. अंबर हॉटेल मागे शेगाव जि. बुलडाणा या तीन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

या तिन्ही गुन्हेगारांची गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांचे विरूध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांचे कडे सादर केला होता. त्याला शुक्रवारी पोलिस अधीक्षकांनी मंजुरी दिली. त्यापूर्वी, बुधवारी रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हरीश गणेश जंगम आणि अक्षय कैलास थोरात या दोघांना हद्दपार करण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी दिला होता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी विझोरा येथील गुन्हेगार धम्मानंद दर्गाजी इंगळे आणि विलास दर्गाजी इंगळे या दोघांना जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते.

आतापर्यंत १३६ टोळ्या हद्दपार

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपावेतो एकूण ६७ इसमांविरूध्द एमपीडीए ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये एकूण १३६ गुन्हेगारी टोळ्यांतील एकूण ३२८ इसमांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कलम ५६ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये ५२ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३८० गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.