esakal | साठा कमी, राशनचा डाळीसाठी रंगणार स्पर्धा

बोलून बातमी शोधा

साठा कमी, राशनचा डाळीसाठी रंगणार स्पर्धा
साठा कमी, राशनचा डाळीसाठी रंगणार स्पर्धा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ योजना - १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मिळालेल्या व सध्या शासकीय गोदामात पडून असलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदामात पडून असेलेल्या ४१६.१३ क्विंटल हरभरा डाळीसह १०० क्विंटल अख्ख्या हरभऱ्याचे वाटप मे महिन्यात पात्र कार्डधारकांना करण्यात येईल.

परंतु लाभार्थी अधिक व डाळीचा साठा अल्प असल्याने ‘पहिले या-पहिले घ्या’ या तत्वानुसार डाळीचे वाटप मे महिन्यात लाभार्थ्यांना करण्यात येईल. त्यामुळे मोफत डाळीसाठी पुढील महिन्यात रास्त भाव धान्य दुकानात स्पर्धा पाहायला मिळेल.

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ योजना - १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत एप्रिल, २०२० ते नोव्हेंबर, २०२० या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य व प्रतिशिधापत्रिका १ किलो तूरडाळ, चणाडाळ मोफत वाटप करण्यात आली होती. त्यासाठी केंद्रशासनाने राज्यासाठी १, १३, ४२ मेट्रीक टन डाळींचे नियतन दिले होते. त्यापैकी १,६,६०० मेट्रीक टन डाळींचे उपरोक्त ८ महिन्यांमध्ये वाटप करण्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या गोदामांमध्ये डाळी शिल्लक आहेत. सदर डाळींचे वाटप करण्यास केंद्र शासनाने १५ एप्रिल २०२१ रोजी मंजुरी दिली. दरम्यान अकोला जिल्ह्यातील गोदामामध्ये सुद्धा ४१६.१३ क्विंटर हरभरा डाळ व १०० क्विंटल अख्खा हरभरा पडून आहे. सदर धान्याचे वाटप करण्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास परवानगी मिळाली आहे. मे महिन्यात रास्त भाव दुकानातून सदर डाळ प्रति कार्डधारकाला एक किलो या प्रमाणात मोफत देण्यात येईल. परंतु डाळ कमी व लाभार्थी अधिक असल्याने पहिले येणाऱ्या लाभार्थ्यालाच डाळ मिळेल, डाळीचा साठा संपल्यानंतर पोहचणाऱ्याला डाळ मिळणार नाही. त्यामुळे डाळीसाठी पुढील महिन्यात रेशन दुकानात चढाओढ पाहायला मिळेल.
-----------------
जितका साठा तितकेच वाटप
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी ज्या तालुक्यात जितका डाळीचा व अख्ख्या हरभऱ्याचा साठा पडून आहे. त्याचेच वाटप त्या तालुक्यातील लाभार्थ्यांना करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात वाटपाचे प्रमाणही वेगवेगळे असेल. त्यातच प्रथम येणाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याने अनेक लाभार्थी मोफत डाळीपासून वंचित सुद्धा राहतील, अशी शक्यता आहे.
---------------
असे आहे जिल्ह्याचे चित्र
- जिल्ह्यात ४३ हजार ४७३ अंत्योदय कार्डधारक आहेत.
- जिल्ह्यात २ लाख ३६ हजार ७१६ प्राधान्य गटातील कार्डधारक आहेत.
..............
जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना एक किलो हरभरा डाळ किंवा अख्खा हरभऱ्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यालाच डाळ मिळेल.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला