Shravan somvar 2022 : हजारो भक्तांचे श्रद्धास्थान गोवर्धन येथील चंदनशेष मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandanshesh Maharaj Mandir Jagurt at Govardhan in Risod Taluk

Shravan somvar 2022 : हजारो भक्तांचे श्रद्धास्थान गोवर्धन येथील चंदनशेष मंदिर

रिसोड - रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे चंदनशेष महाराज मंदिर अतिशय जागृत मानले जाते. पंचक्रोशीतील भाविक भक्तांची दर सोमवारी या ठिकाणी मोठी मंदियाळी असते.

रिसोड पासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असणारे गोवर्धन गाव. रिसोड ते मसला मार्गे डोनगाव रस्त्यावर चंदनशेष महाराजांचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी नागपंचमीनिमित्त पंचक्रोशीतील जवळपास एक लाख भाविक गोवर्धन या गावी येतात आणि नागदेवतांचे दर्शन घेतात. तालुक्यातील तसेच तालुक्या बाहेरील सुद्धा चंदनशेष महाराजांचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.

या मंदिराबाबत गावातील ज्येष्ठ लोकांच्या अनुभवानुसार सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रावजी बापू वाघ हे नागपंचमीच्या दिवशी शेतात जमिनीची मशागत करीत असताना त्यांना निगरुडीच्या झाडाखाली साप चावला होता. परंतु त्यांचे विष उतरुन ते जिवंत राहिले. जवळपास पंधरा दिवसानंतर नागदेवता त्यांच्या स्वप्नामध्ये आली. तिने नागदेवतेचे मंदिर स्थापन कर, असा उपदेश दिला. यापुढे त्यांनी तेथे नागदेवता स्थापन करून चंदनशेष महाराज या नागदेवतेची मनोभावे सेवा केली, असे तेथील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले आहे. त्यांच्या घरातील जवळपास तीन पिढ्यांपासून ही सेवा कायम चालविली जात असल्याचे गावातील नागरिकांनी ही माहिती दिली आहे. पुढे नागोराव वाघ यांनी मंदिराची उभारणी केली.

नागपंचमीच्या दिवशी या गावात शेतातील कुठलेही मशागतीचे काम ग्रामस्थ करीत नाहीत. शेतात मशागतीचे काम केल्यास नागदेवतेला इजा होऊ शकते, असे गावातील लोक सांगतात. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी असते. गोवर्धन येथे रिसोड तालुक्यासहीत इतरही जिल्ह्यातून भाविक भक्त नागदेवतेच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी येथे मोठी वर्दळ असते. या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या निधीतून दोन सभा मंडपाची उभारणी झाली आहे.

श्रावण मासानिमित्त भाविकांची रेलचेल पाहून पोलिस प्रशासन बंदोबस्तासाठी तैनात असते. गावातील नायबराव नाना वाघ व सदाशिवराव वाघ हे आपला वारसा प्रमाणे मंदिराची अखंड सेवा करीत असतात. चंदनशेष महाराजांचे हे मंदिर पंचक्रोशितील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते.

Web Title: Shravan Somvar 2022 Chandanshesh Maharaj Mandir Jagurt At Govardhan In Risod Taluk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaRisodtemple