
Social Media : ‘बुरा ना टाईप करो...ना लाईक करो....ना शेअर करो’! अकोला पोलिसांकडून जनजागृती
अकोला : सोशल मीडियावरील एका पोस्टने अख्या शहराला वेठीस धरल्याचा अनुभव नुकताच अकोलेकरांना आला. या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी आता वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये सोशल मीडियावरील मचकुरांबाबत सावधानता बाळगण्याबाबत जनजागृती सुरू केली आहे.
अकोला जिल्हा हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. येथे कधी कोणत्या कारणास्तव तणावाची स्थिती निर्माण होईल याचा नेम नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पोलिसांना वेगवेगळया उपाय योजना राबवून नागरीकांना सर्तक करणे आवश्यक आहे. त्यासाठी कधी शॉर्ट फिल्म तर कधी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो.
जनजागृतीपर पोस्टर्सची मालिका चालवून जनतेला सतर्क करण्याचे काम पोलिस दलातर्फे सातत्याने केले जाते. जुने विवादीत बाबींचा काही असामाजिक तत्व हे फायदा घेवून सोशल मीडियाचे माध्यमातून निराधार व खोटी अफवा पसरवून जाती- जातीमध्ये तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू आहे. सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालून निष्पाप तरुणाईचे डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे. जेणे करून त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाज मन दुखावले जातील अशा आशयाच्या पोस्ट कोणत्याही सोशल मीडिया माध्यमातून शेअर केले जाणार नाहीत यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.
गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश प्रमाणात १९ ते ३० वयोगटातील तरुण मुलांचा समावेश आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांचे कृतीचा नंतर पश्चाताप होतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलली असते. त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये, अगर फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, घाई-घाईने प्रतिउत्तर देताना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे.
कोणत्याही वर्गाच्या, धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुध्दिपुरस्सर विशिष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे त्या वर्गाच्या, धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती विरुदध कायदेशीर कारवाही होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडिया हाताळतांना विशेष खबरदारी घेण्यात यावी. कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तत्काळ पोलिसांच्या हेल्प लाईन क्रं ११२, किंवा नजिकच्या पोलिस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
शहरभर झळकले पोलिसांचे पोस्टर्स
सोशल मीडिया हाताळताना कोणत्या चुका होऊ नये म्हमून जनजागृती करणारे पोलिस विभागातर्फे माहितीचे बॅनर्स बनवून शहरातील मुख्य ठिकाणी दर्शनी भागावत लावण्यात आले आहेत. नागरीकांना या माध्यमातून माहिती देत जनजागृती केली जात आहे.