esakal | उन्हाळ्यात पावसाचा योग; हवामान विभागाचे संकेत

बोलून बातमी शोधा

ऐन उन्हाळ्यात पावसाचा योग; हवामान विभागाचे संकेत
ऐन उन्हाळ्यात पावसाचा योग; हवामान विभागाचे संकेत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः एकीकडे उन्हाळ्यातील तापमानाचा जोर वाढत आहे तर, दुसरीकडे ढगाळ वातावरणासह पावसाचे योग दिसून येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढळा असून, पारा ४३ अंशापार गेला आहे. परंतु, मे ची सुरुवात वादळी पावसाने होण्याची संकेत हवामान विभागाने दिले असून, अकोल्यासह विदर्भात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जगातील उष्ण शहरांमध्ये अकोल्याने ख्याती मिळविलेली असून, उन्हाळ्यात येथील कमान तापमान ४५ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाते. त्यामुळे ‘हॉट अकोला’ अशी जगभरात अकोल्याची ओळखच तयार झाली आहे. यावर्षी सुद्धा मार्चच्या सुरुवातीपासून पारा वाढायला सुरुवात झाली.

गेल्या आठवड्यापासून तर, कमाल तापमान ४२, ४३ अंश सेल्सिअस नोंदले जात आहे. त्यामुळे मे, जून अधिक उष्ण राहण्याचे संकेत देण्यात येत होते. परंतु, वेळोवेळी येणारी आकाशातील मळभ वातावरणात बदल घडवून आणत आहेत.

आताही पारा चढलेला असताना ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून, १ मे पासून अकोल्यासह विदर्भात मेघ गर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता.२७) सुद्धा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

हेही वाचा: राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

दक्षिण आणि पूर्व राज्य सीमा परिसरातील तालुक्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जमिनीवर तीन किमी उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी अकोल्यासह विदर्भात तसेच मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचे योग दिसत आहेत.

- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर