कोरोना निदानानंतरचे दहा दिवस महत्वाचे

सर्व रुग्णालयांनी प्राणवायू वापराचे ऑडिट करावे- जिल्हाधिकारी
कोरोना निदानानंतरचे दहा दिवस महत्वाचे

अकोला : कोविड १९ च्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतींबाबत सुधारित निर्देशांबाबत राज्य टास्क फोर्सकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांच्या डॉक्टर्सना अद्यावत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व खासगी रूग्णालयांनी त्यांच्या रूग्णालयातील प्राणवायू (ऑक्जीजन) वापराचे ऑडिट करावे. कोविड रुग्णांना वाजवी दरात व कुठलाही त्रास न होता उपचार सेवा व सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित डॉक्टर्सना केले.

येथील नियोजन भवनात आयोजित या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. श्याम शिरसाम, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व तज्ज्ञ साधन व्यक्ती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे हे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी पापळकर यांनी सर्व रुग्णालय संचालकांना फायर ऑडीट व फायर सेफ्टीच्या सर्व निकष तातडीने पूर्ण करावे. हॉस्पिटलची विद्युत यंत्रणा सदोष नसल्याची खातरजमा करावी. थेट एचआरसीटी करुन रुग्णांवर कोविड उपचार सुरू करणे चुकीचे असून याबाबत रेडीऑलॉजिस्टने त्यांच्याकडे केलेल्या एचआर-सीटी चाचण्यांबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक रुग्णालयाने ऑक्सिजनची मागणी दररोज नोंदवावी. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-------------------
निदानानंतरचे दहा दिवस महत्वाचे
या प्रशिक्षणात डॉ. अष्टपुत्रे यांनी उपस्थितांना कोविड १९ च्या उपचार पद्धतीच्या नियमावलीत नव्याने झालेल्या सुधारणांबाबत माहिती दिली. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
- रुग्णांचे संसर्गाच्या पातळीनुसार वर्गीकरण करणे, त्यानंतर वेगवेगळ्या वर्गीकरणानुसार उपचार पद्धतीचा अवलंब करावा.
- रॅपिड वा आरटीपीसीआर चाचण्यांमधून रुग्णाला कोविड संसर्ग झाल्याचे निश्चित झाल्याशिवाय उपचार सुरु करु नयेत. काही लोक केवळ सिटीस्कॅन करुन एचआरसीटी अहवालानुसार थेट कोविडचे उपचार सुरु करतात, असे करु नये.
- निदानानंतरचे दहा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच कालावधीत उपचारांची दिशा पहिल्या तीन दिवसांत निश्चित करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी योग्य पद्धतीने रेमडेसेविरचा वापर, आवश्यकतेनुसार स्टेरॉईडस्चा वापर तसेच अधिक जटील अवस्थेत ऑक्सिजनचा वापर करावा.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com