esakal | ग्रामीण भागातील रुग्णालय बळकट करण्याची हीच योग्य संधी!

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातील रुग्णालय बळकट करण्याची हीच योग्य संधी!
ग्रामीण भागातील रुग्णालय बळकट करण्याची हीच योग्य संधी!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणू कोविड-१९ च्या प्रार्दुभावानंतर राज्यात मोठ्याप्रमाणावर खासगी हॉटेलचे रुपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. येथे रुग्णांसाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकदाची कोरोना साथ निघून गेल्यानंतर येथील साहित्य हे एक तर अडगळीत पडून राहिल किंवा ते नष्ट केले जाईल. अशावेळी या साहित्याचा वापर करून ग्रामीण भागात केअर सेंटर उभारल्यास शहरातील रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी कमी करून गावातच रुग्णांना उच्च दर्जाचे प्राथमिक उपचार मिळू शकेल. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून आतापासूनच त्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरकारी रुग्णांमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे कोविड रुग्णांना व्यावसायिक आधारावर वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी खासगी हॉटेलला कोविड केअर सेंटर म्हणून रुपांतरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर तेथे होणारे उपचार हे मानवीय आधारावर होताना दिसत नाही. रुग्णांना उपाचाराचा मोठा खर्च येथे करावा लागत आहे. सामान्य माणसाला हा खर्च परवडणारा नाही. हॉटेल रूममध्ये तात्पुरते स्वरुपात रुग्णाच्या खोलीत वैद्यकीय सुविधा उपकरणे रुपांतरीत करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर जेव्हा खासगी केअर सेंटरची गरज भासणार नाही, त्यावेळी या सर्व सुविधा टाकून दिल्या जातील किंवा कोरोना लहर संपल्यानंतर त्या नष्ट केल्या जातील. या सर्व पार्श्वभूमीवर कोविड केअर सेंटर हे गावातच सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या रुपात रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.

...............

प्राथमिक आरोग्य केंद्र होतील बळकट

खासगीत दिल्या जाणाऱ्या सुविधा या गावातील केअर सेंटरला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावा. त्यामुळे जिल्ह्यानिहाय विशेषतः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कायम स्वरुपी बळकट होतील. त्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय व जिल्हा स्तरावरील रुग्णालयात होणारी गर्दी कायम स्वरुपी टाळता येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी नॉन मेडिको तरुणांना किमान आवश्यक प्रशिक्षण देवून त्यांची येथे नियुक्ती करता येईल.

आमदार निधीचा होईल उपयोग

राज्यामध्ये तालुका निहाय व जिल्हा निहाय तातडीने नियोजन करण्याची गरज आहे. सरकारने, आमदार निधीतून एक कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी दिली आहे. त्यातून कोविड-१९ साठी लागणाऱ्या साधन सुविधांसाठी निधी खर्चाला परवानगी आहे. त्याचा पण उपयोग ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कायम स्वरुपात बळकटीकरणासाठी होऊ शकतो.

.......................

हॉटेलमधील कोविड केअर सेंटरवर होत असलेली रुग्णांची आर्थिक लुट बघता हॉटेलला कोविड केअर सेंटरची परवानगी देण्याऐवजी सरकारकडूनच अशी तात्पुरत्या स्वरुपातील कोविड केअर सेंटर स्थापित केले जाऊ शकतील व त्याचा भविष्यात कोणत्याही प्रकारच्या साथ रोगाविरुद्ध लढण्यासाठी उपयोग होऊ शकेल.

- प्रा. डॉ. संजय खडक्कार, अकोला