Accident News : ट्रक-ट्रॅक्टर अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

truck-tractor accident tractor broke into two pieces akola police

Accident News : ट्रक-ट्रॅक्टर अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीत बोरगाव मंजू बायपासवर मालवाहू ट्रक व ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. हा अपघात सोमवारी सकाळी घडला.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक एमएच ४८ सीबी ४९९४ हा अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे भारधाव जात होता. त्याचवेळी ट्रॅक्टर क्रंमाक एमएच २७ बीवाय ३१६० हा बोरगाव मंजू बायपास पार करीत असताना ट्रक व ट्रॅक्टरी जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टरच्या मुंड्याचे दोन भाग झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अशोक इंगळे, पोलिस कर्मचारी तुषार मोरे, राजेश चव्हाण यांनी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस करत आहेत

महामार्गावर अपघाताची मालिका

बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी संबंधित विभागाने तसेच संबंधित कंत्राटदाराने लक्ष वेधून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या बायपासचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी कुठलाही अपघात झाला तर त्याचा जवाबदार कोण, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महामार्गावरील बायपासचे काम धोकादायक

राष्ट्रीय महामार्ग हा बोरगाव मंजू गावाबाहेरून गेला आहे. मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे, बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन ते पळसो दहीगावकडे जाण्यासाठी बोरगाव मंजू नजीक राष्ट्रीय महामार्गावर नव्याने बायपास रोडचे काम सुरू आहे. परंतु बायपासचे काम गत काही दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे येथे वाहनांची कोंडी होत असून, अपघाताला निमंत्रण मिळत आहे. काम सुरू असल्याने येथे रस्त्यावरच गिट्टी, मुरुम पडलेला आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत.