esakal | बुलडाणा : पुराच्या पाण्यात आढळले दोन मृतदेह; एकाची ओळख पटली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पुराच्या पाण्यात आढळले दोन मृतदेह; एकाची ओळख पटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील सरंबा गाव तलावात शेगाव येथील वेडसर युवकाचा मृतदेह पाण्यात बुडालेल्या स्थितीत आढळला तर खडकपूर्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून आलेला दुसऱ्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह डिग्रस नजीक नदीतील बाभळीच्या फांद्यात अडकलेला आढळला. अंधार पडल्याने सदर मृतदेह बाहेर काढता आला नाही.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील सरंबा गाव तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना एका व्यक्तीला दिसून आला. पोलिस पाटलांनी दिलेल्या माहितीवरून अंढेरा पोलिस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तलावाजवळ सापडलेल्या पिशवीत सदर व्यक्तीचे मतदान ओळखपत्र सापडले. त्यावर एजाज खान मुस्तफा खान (रा. शेगाव) असे लिहिलेले आहे. पोलिसांनी सदर माहितीवरून शेगाव येथे संपर्क केला असता तीस वर्षीय व्यक्ती वेडसर असल्याचे समजले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

हेही वाचा: विषप्राशन करणाऱ्या महिलेला रुग्णालयात नेत असताना युवकाचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या अज्ञात व्यक्तीचे मृतदेह डिग्रस नजीक बाभळीच्या फांद्यात अडकलेले नागरिकांना बुधवारी सायंकाळी दिसले. सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून अंधार पडल्याने मृतदेह बाहेर काढता आला नाही. खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आल्याने नदीला पूर आला होता. या पुरात सदर मृतदेह वाहून आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकाराबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून, सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.

loading image
go to top