कोरोना महामारीतही व्रतस्थ अवलीयाची अविश्रांत सेवा

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 24 June 2020

‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना। त्या अनाथांच्या उशीला दीप लावू झोपताना। कोणती न जात त्यांची, कोणता न धर्म, त्यांना दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना । । साहित्यभूषण वि. दा. करंदीकरांच्या काव्यातील भावसंवेदना ह्रदयाच्या कॅनवॉसवर येत असतानाच गाडगेबाबा यांचे ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून गाडगेबाबांच्या कार्याचा कोरोना वैश्‍विक महामारीतही ‘ग्लोबल विस्तारा’च्या आलेखात खंड न पडू देता दादरच्या (मुंबई) धर्मशाळेचे प्रमुख व्‍यवस्‍थापक प्रशांत देशमुख हा अवलिया व्रतस्थपणे धर्मशाळेत सुमारे ७०० पेक्षा अधिक कॅन्‍सर रुग्णांना व नातेवाइकांना हक्काचे छत्र उपलब्ध करून देत, त्यांना राजाश्रय दिला. 

अकोला: ‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना। त्या अनाथांच्या उशीला दीप लावू झोपताना। कोणती न जात त्यांची, कोणता न धर्म, त्यांना दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना । । साहित्यभूषण वि. दा. करंदीकरांच्या काव्यातील भावसंवेदना ह्रदयाच्या कॅनवॉसवर येत असतानाच गाडगेबाबा यांचे ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून गाडगेबाबांच्या कार्याचा कोरोना वैश्‍विक महामारीतही ‘ग्लोबल विस्तारा’च्या आलेखात खंड न पडू देता दादरच्या (मुंबई) धर्मशाळेचे प्रमुख व्‍यवस्‍थापक प्रशांत देशमुख हा अवलिया व्रतस्थपणे धर्मशाळेत सुमारे ७०० पेक्षा अधिक कॅन्‍सर रुग्णांना व नातेवाइकांना हक्काचे छत्र उपलब्ध करून देत, त्यांना राजाश्रय दिला. 

 महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशी प्रगल्भ संतपरंपरा महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यात कर्मयोगी गाडगेबाबांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. गाडगे महाराजांची दशसूत्री साक्षी माणून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी अर्पण केले. कॅन्सरशी लढताना रुग्णांना सकस आहार गरजेचा असतो. ही बाब लक्षात घेता देशमुखांनी धर्मशाळेत गाडगेबाबा अन्नछत्राची सुरुवात केली. अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज धर्म शाळेतील रुग्णांना सकस आहार दिला जातो. दूध, फळवाटप सुद्धा नियमितपणे केले जाते. देशमुखांच्या या सेवेला आज यश आलेले आहे. लाखो रुग्ण कॅन्सरमधून मुक्त होऊन आपल्या गावी परतल्याची बाब ते नम्रपणे नमूद करतात. तसेच २०२३ पर्यंत अन्नदानाच्‍या तारीख बूक आहेत. मुंबईतील दानशूर व्‍यक्‍ती या कार्याला सहकार्य करीत आहे. अशा या कार्यात देशमुख कुटुंबीयांची पाचवी पिढी हा सेवेचा वारसा चालवित आहे.

दशसूत्रीचे अक्षर अक्षर वेद नवा बोले...
कर्करोगाच्या रुग्णांंना लांबवेळ उपचाराधीन राहावे लागते. त्यामुळे कर्करोगशी लढताना अनेक गोरगरीब रुग्णांना विविध अडचणीला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत प्रशांत देशमुख यांनी आपल्या कुटुंबासह मुक्काम धर्मशाळेत हलविला आहे. जेणेकरून रुग्णांवर पूर्णपणे लक्ष देता येईल. अनेकदा रुग्णांना मुंबईत येण्यासाठी पैसे नसतात. त्यांच्या तिकिटासाठीचे पैसे सुद्धा देशमुख हे उपलब्ध करून देतात. औषधोपचारासाठी ही मदत केली जाते. धर्मशाळेत सगळ्यांना समानतेची वागणूक दिली जाते. एका कुटुंबाप्रमाणे सगळेजण एक दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी असतात. दशसूत्रीच्या कल्याणकारी मार्गातून धर्मशाळेचा व्याप दिवसेंदिवस वाढत असताना डॉ. विठ्ठल वाघांची दशसूत्रीचे अक्षर वेद नाव बोले संत गाडगेबाबा तुमचे स्वप्‍न पूर्ण झाले, ही रचना आठविल्याशिवाय राहत नाही.

देश लॉकडाउन; मात्र तो अवलिया कॅन्सरग्रस्तांच्या सेवेत
कोरोनाचा संसर्ग पाहता शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यामुळे धर्मशाळेत असणाऱ्या रुग्णांवर मोठे संकट कोसळले. या संकटात रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशांत देशमुख यांनी देशभरातील रुग्णांना धर्मशाळेत आश्रय दिला. एकीकडे कोरोनाच्या नावाने अंगावर काटा येत असताना, जवळचे नातेवाईक आपल्या नातेवाइकांना नाकारत असताना प्रशांत देशमुख हे मात्र धर्मशाळेत रुग्णांची सेवा करण्यात रमलेले होते. त्यांची ते परिवारासारखी काळजी घेत होते. कोणाला साधा खोकला, ताप आला तरी तितक्याच रात्री त्यांच्या खोलीमध्ये जाऊन ते त्यांची आस्थेने विचारपूस करत. त्यांच्या उपचारासाठीची व्यवस्था करत. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे सात माळ्याची इमारत नियमितपणे सॅनिटाइझ करणे. परिसरात फवारणी करणे असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. याकाळात सुमारे ८०० पेक्षा अधिक रुग्णांना त्यांनी त्यांच्या गावात रुग्णवाहिकेने व ट्रेनने सुखरूपपणे सोडलं. लॉकडाउनमुळे नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच हिंदमाता पदपथावर शेकडो पेशंट असल्याची माहिती देशमुखांना मिळाली होती. त्यानंतर देशमुख यांनी थेट हिंदमाता पदपथ गाठत या रुग्णांना धर्मशाळेत आसरा दिला. त्यांची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था केली. या सगळ्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने व शासनाने वेळोवेळी मदत केल्याची बाब प्रशांत देशमुख हे नम्रपणे नमूद करतात.

ओसाड माळरानाचा विस्तारला वटवृक्ष
जेव्हा दादरच्या धर्मशाळेच्या प्रमुख व्‍यवस्‍थापकपदाची जबाबदारी प्रशांत देशमुख यांच्याकडे आली तेव्हा धर्मशाळेची अतिशय बिकट स्थिती होती. त्यांनी धर्मशाळेच्या विस्तारासाठी दान दात्यांच्या मदतीने कसोशीने प्रयत्न केले. त्याची परिणीती म्हणून पाच माळ्याची इमारत आपल्याला आज सात माळ्याची भव्यपणे उभी दिसेल. त्यामध्ये दीडशे खोल्या. एक मोठा हॉल. तीन छोटे हॉल. २५० रुग्ण व साडेपाचशे नातेवाईक असे एकूण ८०० जण येथे वास्तव्याला असतात. कॅन्सरशी लढताना कुठेही रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचा मानसिक मनोबल खचू नये यासाठी नियमित सायंकाळी गाडगे महाराजांची प्रार्थना केली जाते. आठवड्यातून तीन दिवस योगा केला जातो. महिन्यातून एकदा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात मुंबईतल्या अनेक कलाकारांनाही आमंत्रित केले जाते.

तिमिरातूनी तेजाकडे...
प्रशांत देशमुख यांनी कॅन्सरमुक्त भारत अभियान (कॅन्सर फ्री इंडिया मुमेंट) तीन वर्षांपासून राबवण्यास सुरुवात केली. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश येथे या अभियानाला लोकसहभागातून मोठे पाठबळ मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्था, शासन त्यांना या उपक्रमासाठी मदत करतात. याच माध्यमातून गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व्यसनमुक्तीच्या संदेशाचा प्रचार-प्रसार केला जातो. संत गाडगेबाबा रुग्ण सहाय्यता तथा मार्गदर्शन केंद्रही प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले. या केंद्राचे वैशिष्ट्ये असे की, कॅन्सरच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण या केंद्रावर स्वानुभवातून इतरांना मार्गदर्शन करतात. दार्जीलिंग, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, आग्रा, फिरोजाबाद, वृंदावन, मथुरा येथे त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे; तर गाडगेबाबांच्या नावाने फिरोजाबाद येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचाही मानस तेथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी दिनेशचंद्र जैन चॅरिटेबल ट्रस्टचे उद्योगपती राहुल जैन हे आर्थिक पाठबळ देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The untiring service of Vratastha Avaliya even in the Corona epidemic