
Venus News : आज शुक्र-चंद्राची विलोभनीय पिधान युती
अकोला : खगोलप्रेमींसाठी शुक्रवार (ता.२४) हा शुक्र-चंद्राची विलोभनीय पिधान युती येऊन घेणार आहे. या ग्रहांच्या अनोख्या युतीचे विलोभनीय दृष्य बघण्याची संधी यानिमित्ताने संधी प्रकाशात मिळणार आहे.
‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ या काव्यपंक्ती प्रमाणे सध्या स्थितीत पश्चिम आकाशात सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह अधिराज्य गाजवत आहे. ता. २४ मार्चला पृथ्वी, चंद्र व शुक्र एका रेषेत येत असल्याने सुमारे दीड तास हा ग्रह सायंकाळी ४.१७ ते ५.५१ या वेळात पिधान अवस्थेत असताना तो चंद्रबिंबाआड झाकला जाईल.
ही एक प्रकारची ग्रहण स्थिती असते. मात्र, ही खगोलीय घटना पश्चिम आकाशात संधीप्रकाश असताना पाहता येईल. या काळात चंद्रकोरी जवळच शुक्र ग्रह दिसेल. या अनोख्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन विश्व भारतीचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
सध्या शुक्र ग्रह अत्यंत तेजस्वी असून, त्याची दृष्यप्रत उणे चार आहे. या ग्रहाचे स्थान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असल्याने याचा उदय वा अस्त पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर होतो. म्हणूनच याला सायंकालीन वा प्रभातकालीन तारा समजतात. कार्बनडाय ऑक्साईडच्या ढगांमुळे याला बुरख्यातील सुंदरी म्हणतात. या ढगांमुळे सूर्य प्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित होऊन हा ग्रह ठराविक वेळी भरदिवसा साध्या डोळ्यांनी पाहता येतो. अंतर्ग्रह असल्याने याच्या कलांचे दर्शन दुर्बिणीतून घेता येते.