esakal | विठ्ठल महाराज साबळेंपाठोपाठ पत्नी गोकुळाताईंची प्राणज्योत मालवली

बोलून बातमी शोधा

विठ्ठल महाराज साबळेंपाठोपाठ पत्नी गोकुळाताईंची प्राणज्योत मालवली
विठ्ठल महाराज साबळेंपाठोपाठ पत्नी गोकुळाताईंची प्राणज्योत मालवली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि. अकोला) ः वारकरी संप्रदायामध्ये मृदुंगाचा राजा म्हणून ओळख असलेले विठ्ठल महाराज साबळे यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी गोकुळाताई यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झालेले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. महाराजांचा मुलगा ऋषी यांचीही प्रकृती खालावली आहे.

विठ्ठल महाराज साबळे हे आपल्या मृदुंग वादानाकरिता व कीर्तन, भागवत, विशेषतः भाषण शैलीकरिता सुप्रसिद्ध होते. महाराजांनी अवघ्या तारुण्यामध्ये महाक्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले. आपल्या गावी आल्यानंतर गावागावात जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार करायला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीमध्ये महाराजांनी बरेच मृदंग, वादक, कीर्तनकार घडवले. समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची शांतीवन अमृत तीर्थ प्रगतिपथावर आणण्याकरिता साबळे महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे.

महाराज विदर्भ वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नुकतेच विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्षपदसुद्धा महाराजांना मिळाले होते. वारकरी संप्रदाय हा राजकीय क्षेत्रातही मागे नसावा याकरिता ते जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे राहिले होते. कुणबी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये साबळे महाराजांचे अग्रगण्य स्थान होते. पण गेल्या काही दिवसापासून महाराजांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली.

त्यात कुटुंबातील सर्वच पॉझिटिव आले. साबळे महाराजांना अकोला सरकारी दवाखान्यात बेड न मिळाल्यामुळे मूर्तिजापूरला त्यांचे मित्र डॉ. नेमाडे यांच्या माध्यमातून महाराज व त्यांच्या सौभाग्यवती दवाखान्यामध्ये भरती झाले. महाराजांना बुधवारी (ता. २८) पहाटे हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली.

लागोपाठ दुपारी ११ वाजता गोकुळाताई साबळे यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा ऋषी साबळे अकोला सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे. वारकरी संप्रदायामध्ये कधीही न भरून निघणारी हानी झालेली असल्याचे गणेश महाराज शेटे यांनी विश्व वारकरी सेना व महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने विठ्ठल महाराज साबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संपादन - विवेक मेतकर