काय म्हणता कोरोनाने दिली रोजगाराची संधी...कुठे मिळणार रोजगार वाचाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

कोरोना प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे परप्रांतिय मजूर निघून गेल्याने स्थानिक उद्योजकांकडील आस्थापनांवर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांचेमार्फत स्थानिक कुशल-अकुशल रोजगाराच्या संधी शोधणारे युवक-युवती व ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, असे उद्योजक यांच्यात दुवा साधण्याचे काम करीत आहे.

अकोला : कोरोना प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे परप्रांतिय मजूर निघून गेल्याने स्थानिक उद्योजकांकडील आस्थापनांवर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांचेमार्फत स्थानिक कुशल-अकुशल रोजगाराच्या संधी शोधणारे युवक-युवती व ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, असे उद्योजक यांच्यात दुवा साधण्याचे काम करीत आहे. त्यासाठी शासनाच्या या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. त्यामुळे स्थानिक तरुण तरुणींना स्थानिक उद्योगांमध्ये रोजगाराची संधी मिळेल.

 

या संदर्भात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांनी कळविले आहे की, कोरोना विषाणूच्या (कोव्हीड-19) प्रादुर्भावामुळे अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग औद्योगिक आस्थापनांवरून आपापल्या गावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. उद्योजकांना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू नये आणि स्थानिक उमेदवारांना खासगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांचे मार्फत उद्योजकांशी चर्चा करून रिक्तपदाचा तपशिल घेण्यात येत आहे.

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 

जिल्ह्यातील रोजगार इच्छूक उमेदवारांनी आपली नोंदणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने विकसीत केलेल्या या संकेतस्थळावर करावी. जेणेकरून उद्योजकांना त्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल. ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे, परंतु आपले आधार कार्ड सेवायोजन कार्डाशी लिंक केलेल नसेल अशा उमेदवारांनी आपल्या लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून आधार कार्ड लिंक करून घ्यावे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता अद्ययावत करून घ्यावी. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर रिक्तपदे अधिसूचित करण्याची तसेच पात्र उमेदवारांची यादी प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

 

आस्थापनांनी मनुष्यबळाची मागणी नोंदवावी

जिल्ह्यातील ज्या औद्योगिक आस्थापनांना कुशल-अकुशल मनुष्यबळाची आवश्यता असेल अशा आस्थापनांनी संकेतस्थळावर आपली मनुष्यबळाची मागणी नोंदवावी. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु.रा.झळके, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, प्रशाकीय इमारत दुसरा माळा, अकोला यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What do you say Corona gave employment opportunities ... read where to get employment akola district marathi news