जिल्ह्यात हिवताप घटतोय तर डेंगी वाढतोय!

भगवान वानखेडे 
Friday, 12 June 2020

चार वर्षात हिवतापाचे 192 तर डेंगीचे 182 रुग्ण ः उपाययोजनांना सुरुवात

अकोला ः अकोला जिल्ह्यात मागील चार वर्षात हिवतापाचे एकुण 192 रुग्ण आढळून आले आहेत तर डेंगीचे 182 रुग्ण. मात्र, असे जरी असले तरी हिवतापाचा आलेख उतरता असून, डेंगीचा आलेख चढता आहे. तेव्हा नागरिकांनी आता या कोरोना संकटात स्वतःला जपून ठेवणे गरजेचे आहे.

पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, हिवताप(मलेरिया), लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांमुळे माणसे दगावल्याचे कानावर येत राहते आणि त्याचबरोबरीने या आजारांची भीतीही वाढू लागते. आता या सर्वांच्या सोबतीला महाभयंकर असा कोरोनाही येऊन आपले रुद्ररुप दाखवित आहे. त्यामुळे नागरिकांची आता स्वतःप्रती जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने डेंगी, हिवताप या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. या आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तस्राव होणे, थुंकीतून रक्त पडणे, लघवी किंवा विष्ठेमधून रक्त पडणे, अंगावर लाल चट्टे येणे ही लक्षणे दिसून येतात. साधारणपणे मानवी शरीरामध्ये अडीच ते साडेतीन लाख प्लेटलेट्स असतात. या पेशी एक लाखांपेक्षा कमी झाल्या असतील, तर काळजी घेणे आवश्यक असते मात्र धोकादायक नसते. प्लेटलेट्सची संख्या 20 हजारांहून कमी झाल्यास मात्र धोक्याचे लक्षण आहे.

विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरियाचा ताप
या सर्व आजारांची लक्षणे साधारण एकसमान असून, सुरुवातीला ताप येतो. त्यामुळे विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू, मलेरियाचा ताप कसा ओळखावा, असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. विषाणूंमुळे येणारा ताप साधारणपणे दोन ते चार दिवस असतो. या तापामध्ये अंगदुखी, उत्साह कमी होणे, थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. व्यवस्थित आहार, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन यातून घरच्या घरीच बरे होता येते. मात्र थंडी भरून ताप येत असेल, काही ठरावीक कालावधीने उदाहरणार्थ दर आठ किंवा १२ तासांनी ताप येणे, उलटी, मळमळ किंवा जुलाब होणे, दम लागणे, अन्नपचन न होणे आदी लक्षणे असल्यास ताप अंगावर न काढता तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावेत.

अशी घ्या काळजी
तापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तत्काळ औषधोपचार सुरू करावेत. शारीरिक अवस्थेनुसार आवश्यकता भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. औषधोपचार सुरू असतानाच रुग्णाचे जेवण आणि पाण्याच्या सेवनाकडे नातेवाईकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मलेरियामध्ये रक्तातील साखर कमी होते. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांच्याबाबत ही काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करावा. बहुतांश वेळा रुग्ण ताप किंवा अन्य त्रास बरे झाले की औषधे घेणे बंद करतात. त्यामुळे मग दाद न देणारा तापही होण्याची शक्यता असते.

असा घटला हिवताप अन वाढला डेंगी
वर्ष          रक्त नमुने           हिवताप           डेंगी
2016         351498               92                21
2017          324684             53                 28
2018           336538            36                 72
2019          358211             11                  61
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While malaria is decreasing in the district, dengue is increasing!