जागतिक चिमणी दिन : चिऊताईच्या संवर्धनाची जागृती ग्रामीण भागात अधिक

चिमणी गणनेत ६३ टक्के ग्रामीण व ३७ टक्के शहरी
world sparrow day Awareness of sparrow conservation high in rural areas akola
world sparrow day Awareness of sparrow conservation high in rural areas akolasakal

अकोला : निसर्गकट्टा, शिक्षणाधिकारी (माध्य.)  व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या संयुक्तपणे अकोला जिल्ह्यासाठी आयोजित ऑनलाइन चिमणी गणनेत जिल्ह्यातील जवळपास चार हजार लोकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ६३ टक्के ग्रामीण व ३७ टक्के सहभाग शहरी नागरिकांचा आहे. त्यामुळे चिऊताईच्या संवर्धनाबाबत शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त जागृती दिसून आल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने २ ते १९ मार्च दरम्यान आयोजित या चिमणी गणनेत सात प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाच्या अनुषंगाने नागरिकांची मते जाणून घेतली. यात ५ ते १० चिमण्या २५ टक्के, १० ते २० चिमण्या ४२.५ टक्के, ५० ते १०० चिमण्या २९.३ टक्के भागात दिसण्याचे प्रमाण आहे. फक्त ३.२ टक्के भागात चिमण्या दिसत नाहीत.

बारा महिने चिमण्या दिसण्याचे प्रमाण ३८.६ टक्के, उन्हाळ्यात २४.९ टक्के, हिवाळ्यात २१.८ टक्के तर, पावसाळ्यात सर्वात कमी १४.७ टक्के चिमण्या दिसतात. ८६.४ टक्के लोकांनी चिमण्यांसाठी घरासमोर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समोर आले असून, ८१.३ टक्के लोकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चिमणी दिन व सर्वेबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी समाजातील गणमान्य व्यक्तींनी स्वयं प्रेरणेने सोशल मीडियावरून आवाहन केले होते. ही गणना यशस्वी करण्यासाठी निसर्गकट्टाचे डॉ. मिलींद शिरभाते, संदीप वाघडकर, प्रदीप किडीले, मनोज लेखनार, डॉ. संतोष सुराडकर, गौरव झटाले व अजिम शेख यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

सर्व्हेचा उद्देश

अकोल्याला जिल्ह्यातील चिमण्यांची स्थिती काय आहे व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करावे, यासाठी या सर्व्हेचे आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षी फक्त ७०० लोकांनी या सर्व्हेत सहभाग नोंदविला होता. या वर्षी जवळपास ४००० लोकांनी यात सहभाग घेतला. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळल्याचे निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले.

चिऊताईला मिळणार हक्काचा निवारा

या वर्षी ९४.५ टक्के लोकांनी चिऊताईला हक्काचा निवारा देण्याचे ठरविले आहे. निसर्गकट्टाच्या माध्यमातून जवळपास १००० पुठ्ठांची कृत्रिम घरटे लावण्याचे नियोजन या सर्व्हेच्या माध्यमातून केले आहे.

विद्यार्थ्यांना माहिती संकलनाची झाली आवड

चिमणी गणनेच्या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता व माहिती संकलनाची आवड निर्माण झाल्याचे अकोल्याच्या शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. सुचिता पाटेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com