मजुरांच्या घरातील चुली झाल्या थंड; मदतीचा ओघ आटला, मजुरीही मिळेना

Labour.jpg
Labour.jpg

वाशीम : सकाळी मजुरीच्या आशेने मजुरवर्ग नाक्यावर येतो. शे-दिडशेच्या गर्दीत २०-२५ मजुरांना अर्ध वेळ मजुरी देणारा मालक मिळतो. इतरांना मात्र घरी परत जावे लागते. कामावर जाण्यासाठी हाती घेतलेली शिदोरी घेवून घर गाठल्यानंतर घरातील थंड झालेली चुल जगण्याची दहाकता प्रत्येक झोपडीत अनुभवता येत आहे. शासनाने राशनच्या माध्यमातून सोय केल्याचा दावा केला असला तरी, मिळणारे धान्य व खाणारी तोंडे याचा कोठेच मेळ बसत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मदत नाही परंतु, या मजुरांच्या कामाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.


ग्रामीण भागामध्ये एकीकडे काम नसताना शहरी भागातील हातावर पोट असणारी वस्तीही सायंकाळच्या जेवणाच्या विवंचनेत कासाविस होत असल्याचे चित्र आहे. शहराबाहेर टिनाचे तर कधी प्लॉस्टीकचे घरकुल उभे करून शहरात मिळणारे कोणतेही काम करणाऱ्या मजुरांची संख्या प्रत्येक शहरात मोठी आहे. जिल्हयाचे ठिकाण असलेल्या वाशीम येथील रिसोड नाका परिसरात दररोज सकाळी ७ वाजता दिडशे ते दोनशे मजूर गोळा होतात. याठिकाणी ज्याला मजुराची गरज आहे तो व्यक्ती येवून मजुरी ठरवून मजुरांना घेवून जातो. हा प्रघात गेल्या १५ वर्षापासून सुरू आहे. मात्र कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून हे नाके खिन्न झाले आहेत. नाक्यावरील मजूर हे मुख्यत्वे बांधकाम क्षेत्र व शहरातील परसबागेतील गवत काढणे व इतर सटरफटर कामासाठी मजुरीवर नेले जातात. मात्र गेल्या तीन महिण्यापासून बांधकामे पूर्णत: बंद आहेत. कोरोनाच्या धास्तीने वैयक्तीक कामासाठीही कोणी मजूर सांगत नसल्याने प्रत्येक शहरात दोनशे ते तिनशे कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यामध्ये काही राजकिय व्यक्ती व दानशूर व्यक्तींनी किराणा सामानाचे वाटप करून तब्बल दोन महिने झोपडीतील चुली पेटत्या ठेवल्या होत्या मात्र, दातृत्वालाही मर्यादा असतात. या नियमाने आता या मजुरांची परिस्थिती बिकट झाली आहे.

राशनने पोट भरेना
शासनाच्या वतीने दरमहा प्रत्येक कुटुंबाला ३० ते ३५ किलो धान्य दिले जाते. मात्र या मजुरांच्या घरामध्ये सहा ते सात तोंडे खाणारी असल्याने महिन्यातील आठ दिवस राशन पुरते. इतर २५ दिवसांसाठी जगण्याचा संघर्ष नाक्यापासून घरापर्यंत सुरू आहे. कधी चुल पेटते तर कधी ती थंड होते. हे चित्र शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, काळे फैल रस्ता, बसस्थानक परिसर, नालंदा नगर परिसर, राजस्थान कॉलेज रस्ता या परिसरात पहावयास मिळते. काम नसल्याने मुलूल झालेले चेहरे या झोपडपट्यांच्या झाडाखाली उसासे देत आहे.

फक्त हाताला काम द्या
शासनाने राशनच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबाला जगण्यासाठी आधार दिला असला तरी, तो आधार आता तोकडा पडत आहे. तीन महिण्याच्या लॉकडाउननंतर परिस्थिती सुधारेल ही आशाही आता मावळत चालली आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने रोहयो अंतर्गत मागेल त्याला काम ही संकल्पना सुरू केली असली तरी, शहरी भागामध्ये मात्र त्याची अंमलबजावणी नाही. नगरपालिका स्तरावरही अशा गरजू कुटुंबियांचे युध्द पातळीवर सर्वेक्षण करून त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. शासनाची सध्या वृक्ष लागवड योजना सुरू होत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम मशिनच्या सहायाने होत आहे. याच ठिकाणी या मजुरांना काम मिळाले तर मजुरांच्या घरातील चुलीला उपवास घडणार नाही.

संपादन - अनुप ताले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com