धक्कादायक... जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनातच कोरोना!

सुगत खाडे
Friday, 24 July 2020

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जिल्हा परिषद अर्थात मिनीमंत्रालयातच शिरकाव केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतीभा भोजने यांच्या दालनात शिपाई पदी कार्यरत कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील नेते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. 

अकोला  ः जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जिल्हा परिषद अर्थात मिनीमंत्रालयातच शिरकाव केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतीभा भोजने यांच्या दालनात शिपाई पदी कार्यरत कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील नेते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. 

कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. महानगरातून शहर व आता गाव खेड्यात पोहचलेल्या कोरोनाने शासकीय कार्यालयात सुद्धा शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या कक्षात कार्यरत शिपायालाच कोरोनाची लागन झाली आहे. कक्षात येणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्याला पिण्याला पाणी देण्यासह सदर कर्मचारी एका विभागातून दुसऱ्या विभागात कागदपत्रे, फाईल पोहचवून देत होता.

सदर कर्मचाऱ्याने 17 जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात संपूर्ण दिवस सेवा दिली. परंतु त्यानंतर 18 व 19 जुलै रोजी शासकीय सुटीच्या दिवशी तो बिमार झाला. त्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याची 22 जुलैरोजी भरतीया रुग्णालयात रॅपिड अँटीजन टेस्ट केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. सदर प्रकाराची माहिती जिल्हा परिषदेत पसरताच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेत गुरुवारी (ता. 23) दिवसभर या विषयाची चर्चा रंगली होती. 

कक्षांचे निर्जंतुकीकरण 
अध्यक्षांच्या कक्षात कार्यरत शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी (ता. 23) जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने, उपाध्यक्ष राठोड यांच्या कक्षांसह सामान्य प्रशासन विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 
 
अतिजोखीमेच्या 32 लोकांचा शोध 
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या शिपायाच्या निकटवर्तीयांचा शोध आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. संबंधित शिपाई 32 लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित 32 लोकांपर्यंत पोहचण्याचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 

कर्मचारी पाॅझिटिव्ह, इतरांचा शोध सुरु
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात कार्यरत शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्मचाऱ्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. 
- डॉ. सुरेश आसोले 
जिल्हा आरोग्य अधिकारी, 
जिल्हा परिषद, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zilla parishad presidents employee corona positive in akola