- विवेक सौताडेकर, साहित्यिक तथा इतिहास संशोधक, लातूर
खरं तर भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. अन् या सणांमध्ये सर्वात मोठा सण म्हणून दीपावली या सणाकडे पाहिले जाते. हिंदू संस्कृतीतील हा मुळ भारतीयांचा सण जरी असला तरी त्याची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व धर्मियांपर्यंत पोहोचली आहे. भारतात सर्वत्र साजरा होणारा हा सण पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकाळात येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्याचे वास्तव उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते, त्या काळातच झाला असे म्हणतात. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायनी या तीन यज्ञांचे एकीकरण व रूपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा अशीही कल्पना आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, १४ वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले ते याच दिवसात. त्यावेळी अयोध्येतल्या प्रजेने आनंदाने दीपोत्सव केला आणि तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी चालू झाला.
पुराणात दीपावली संबंधी कथा प्राचीन काळातील महाबलाढ्य राजा बळी आणि वामन या कथेशी जोडतात. ही कथा आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावस्या या तीन दिवसात घडली. त्यामुळे या तीन दिवसांत जो कोणी या प्रित्यर्थ दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत अन् त्याच्या घरात निरंतर लक्ष्मीची वास्तव्य असेल, तेव्हापासून दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरु झाली. तेव्हापासून कार्तिकी शुद्ध प्रतिपदेला बळीचे दिवस म्हणून लोक त्याही दिवशी आनंदोत्सव साजरा करू लागले.
जैन धर्मीयांच्या हरिवंशपुराणानुसार या उत्सवाचा प्रारंभ तो असा, आश्विन अमावस्येला महावीर या शेवटच्या तीर्थंकरांची निर्वाण झाले. त्यावेळी जे देव राजे व भक्त तिथे उपस्थित होते, त्यांनी महावीरांची पूजा करून दीपाराधना केली. ज्ञानदीप निघून गेला आहे. आता आपण साधे दिवे लावून प्रकाश कायम ठेवू या असा जैनांनी विचार केला, तेव्हापासून महावीरांचे भक्त दरवर्षी जिनेश्वराची पूजा करून दीपोत्सव साजरा करू लागले. जैनांनी ही तिथी महत्त्वाची मानून वीर निर्वाण संवंत नावाचा एक नवा शक चालू केला.
दिवाळीच्या उगम आणि संबंधी ऐतिहासिक कल्पना अशी आहे की, सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला. दुसरी कल्पना अशी आहे की, सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दरवर्षी साजरा करण्याची प्रथा पडली. त्यालाच दीपावली हे नाव पडले असावे.
दीपावली हा एक धार्मिक उत्सव असून, या उत्सवात निरनिराळ्या दिवशी जे धार्मिक विधी केले जातात. त्याचे विस्तृत वर्णन पुराणात वाचावयास मिळते. सारांशत: धनत्रयोदशी- धनत्रयोदशी आश्विन वद्य त्रयोदशी या दिवशी घरातील सोने- नाणे व अलंकार स्वच्छ करून त्याची पूजा करतात. आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे.
नरक चतुर्दशी
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या अन्यायी राजाचा वध केला. तो हा दिवस. या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाच्या पीडा होणार नाहीत, अशी आख्यायिका असल्यामुळे सूर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून उष्णोदकाने पायाखाली (अपामार्ग) आघाडा वनस्पती घेऊन स्नान करतात.
लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते. आपल्या निवासासाठी स्वच्छ व योग्य स्थान शोधते तो हा दिवस. त्यामुळे या दिवशी प्रातःकाळी मंगलस्नान करून लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे.
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा या रात्री बळीची पूजा करावयाची केली जाते. यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची लोक पूजा करतात. याच दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा असल्याने घराच्या अंगणात शेणाचा पर्वत करून त्याची पूजा करतात. गोठ्यातील गायी- बैलांना सजवून त्यांची पूजा करतात. दिन- दिन दिवाळी...गाई म्हशी ओवाळी... अशा पद्धतीची त्यांची आरतीही करतात. त्याचबरोबर वसुबारस (गोवत्स द्वादशी) आणि भाऊबीज यमद्वितीया हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो. पण, वस्तुतः हे सण वेगळे आहेत.
दिवाळीत आकाशदिवे लावण्याची प्रथा आहे. आश्विन शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत हे लावतात. भारतीय वाड्.मयात दीपावलीचे उल्लेख अनेक भिन्न- भिन्न नावांनी आलेले आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रात यक्षरात्री नामक उत्सवाचा उल्लेख आहे. हेमचंद्राच्या मते, यक्षरात्री म्हणजे दिपालीका उत्सव होय. श्रीहर्षाच्या नागानंद नाटकातील दीपकप्रतीपदुत्सव म्हणजेही दीपावलीचाच उत्सव. नीलमत पुराणात त्यालाच दीपमाला उत्सव असेही म्हणतात.
दीपावलीचे सामाजिक स्वरूप हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतात साधारणपणे सारखेच आहे. घरे स्वच्छ झाडून, सारवून रंगवून आणि फुलांच्या माळा, पताका, तोरणे वगैरे लावून सुशोभित करणे, अभ्यंग स्नान करून मौल्यवान वस्त्रालंकार धारण करणे मिष्टान्नभोजन, दिव्यांची रोषणाई, लक्ष्मीपूजन, दीपदान, मनोरंजन, खेळ इत्यादी कार्यक्रम होतात. त्याशिवाय प्रत्येक प्रदेशाची काही वेगळे वैशिष्ट्य आहे ती अशी, गुजरातीत आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला ‘वाधवारान’ असे म्हणतात. या दिवशी सकाळी उठून स्त्रिया रांगोळ्या काढतात. त्यात वाघांची चित्र हमखास असते. ते चित्र भाऊबीजीपर्यंत ठेवतात. राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला त्या घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंका दहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही नुकसान केले तरी तिला मारत नाहीत.
पंजाबमधील लोक राम राज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीचा दीपोत्सव करतात. तिथले शीख लोकही अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतिदिन म्हणून हा सण पाळतात. उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागातील लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात. रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठची माती आणून ते एक चबुतरा करतात. त्यावर काटेरी वृक्षांची फांदीवरून तिची पूजा करतात.
बंगालमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने होतो. पण, तिकडे लक्ष्मीपूजन यापेक्षा कालीपूजनाला विशेष महत्त्व मिळाले आहे. नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्युतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच शिवाय कुत्रे, गाई, बैल यांचीही पूजा करतात. गोव्यातली दिवाळी सामुदायिक अतिथ्याची असते. शेजारी-पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात. दूध गुळाच्या-पोह्यांचा फराळ करतात. दक्षिण भारतात त्या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगा स्नाना इतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्ये काही लोक नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर स्त्रिया रात्रभर बसून लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. केरळ मधील पूनम हा उत्सव आश्विन मासात बळीच्या स्मरणार्थ साजरा होतो.
महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची क्षणाची आकृती करून तिच्या घरातील सर्व केरकचरा जाळतात. नगर जिल्ह्यात दिवाळीच्या दिवसात गुराखी कांधळाच्या सुंदर दिवट्या विणून संध्याकाळी गुरांना ओवाळतात. गाणी म्हणतात. ठाणे जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी अंगणात शेणाचा किंवा तांदळाच्या पिठाचा बळिराजा काढून त्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी त्या आकृती जवळच कडू जिरे, झेंडू किंवा किंवा अंबाडीचे झाड लावतात. दिवाळीच्या दिवसात मातीचे किल्ले बनवून त्याच्याभोवती ऐतिहासिक देखावे व प्रसंग उभे करण्याची प्रथा या शतकात सुरू झाली आहे. आकाश दिवा हा काळोख नाहीसा करण्याचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे दिवाळी सणाची विशेष महत्त्व सांगता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.