नवी दिल्ली :`अल कायदा‘ हा इस्लामला ढाल बनवून मानवतेला रक्तबंबाळ करणारा दहशतवादी समूह आहे. या गटाला मुस्लिमांच्या हिताशी काही देणेघेणे नसून उलट त्यांच्यासाठी तो ‘संकट'' आहे, असा प्रतिहल्ला केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी चढविला आहे. अल कायदाच्या धमक्यांना मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांनी दिलेले हे सडेतोड उत्तर म्हणजे प्रेषित महंमद पैगंबर अवमान प्रकरणी आतापर्यंतचा बचावाचा पवित्रा मोदी सरकार सोडत किंवा सोडू इच्छित असल्याचे द्योतक मानले जाते. दरम्यान, आखाती देशांतील भारतीय पूर्ण सुरक्षित आहेत असा निर्वाळा मोदी सरकारमधील मंत्री पीयूष गोयल यांनी दिला आहे.
अल कायदाने आत्मघाती हल्ले करण्याची धमकी आहे. याआधी आखाती देशांच्या टीकेला भारताने संयमाने उत्तर दिले होते. मात्र आता दहशतवादी गट यात उतरल्याचे पाहताच भारताने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. यासाठी नक्वी पुढे आले आहेत. त्यांना भाजपने लोकसभा व राज्यसभेचेही तिकीट दिलेले नाही.
अल कायदाच्या धमकीबाबत ते म्हणाले, ‘अल कायदा हा दहशतवाद्यांचा गट आहे. जे लोक पाकिस्तानच्या अपप्रचाराला बळी पडत आहेत त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की हिंदुस्थानच्या विविधतेतील एकतेची ताकद त्यांच्या धमक्यांनी कमकुवत होणार नाही.‘
‘जे लोक संकुचित व निवडक मानवाधिकारांबद्दल बोलतात. मात्र जगात जेथे जेथे मानवाधिकाराच्या चिंधड्या उडतात, अल्पसंख्याकांवर खुलेआम अनन्वित अत्याचार होतात तेव्हा हे डोळे बंद करून घेतात,` अशा शब्दांत त्यांनी काश्मीर तसेच चीनचा उल्लेख न करता खडसावले.
राज्यांना दक्षतेच्या सूचना
अल कायदाच्या भारतीय उपखंडातील ‘एक्यूआयएस'' या दहशतवादी गटाने काढलेल्या पत्रकात दिल्ली, मुंबई व उत्तर प्रदेशात हल्ले करून महंमद पैगंबर यांच्या सन्मानाची लढाई लढेल, असे म्हटले आहे. हे पत्रक जाहीर होताच केंद्र सरकारने सर्व राज्यांना दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या असून गुप्तचर संस्थाही सक्रिय झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांना चोवीस तास सजग राहण्याचे निर्देश गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहेत.
भारतीय सुरक्षित : गोयल
आखाती देशांतील भारतीय पूर्ण रक्षित आहेत व भारत सरकार त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी सातत्याने घेत आहे असा विश्वास केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणानंतर कतार, ओमानसह १५ आखाती व इस्लामी देशांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. काही देशांनी त्या त्या भारतीय राजदूतांना बोलावून आपली नाराजी व्यक्त केली होती. कतारने भारताकडून जाहीर माफीची मागणी केली आहे. आखाती देशांत लाखो भारतीय राहतात. गोयल यांनी या देशांतील भारतीयांची चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कोठेही (भारतीयांविरूद्ध) तणाव नाही. संबंधित वक्तव्य भारत सरकारमधील कोणत्याही घटकाने दिलेले नाही त्यामुळे सरकारवर वा आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.‘भारत जगाचे नेतृत्व करतो व यापुढेही तसेच करेल. या सर्व देशांबरोबर भारताचे चांगले द्विपक्षीय संबंध यापुढेही कायम राहतील असाही विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.