67311
संचमान्यता, समायोजन, वेतन बंदीला स्थगिती
शिक्षण संचालक ः ‘शिक्षक भारती’ला यश
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३१ : राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या संदर्भात न्यायालयीन आदेश झाल्यानंतरही समायोजनाची प्रक्रिया सुरू होती. समायोजनास नकार दिलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतनही थांबविले होते. याबद्दल शिक्षण संचालकांनी संचमान्यता, समायोजन आणि वेतन बंदीला स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात माजी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांची भेट घेऊन, न्यायालयीन आदेशानंतरही समायोजन प्रक्रिया सुरू असल्याचे, वेतन थांबविल्याचे निदर्शनास आणून दिले. आरटीई कायद्यातील तरतुदी आणि महाराष्ट्र राज्य सेवा शर्ती नियमावली १९८१ यांच्याशी विसंगत १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय असल्याचेही लक्षात आणून दिले होते. त्यानंतर शासनाने संचमान्यता आणि समायोजन प्रक्रिया थांबविल्याचे जाहीर केले आहे.
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संबंधित आदेश मुंबईसही लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेकडो शिक्षकांचे पगार बंदीचे संकट तूर्त दूर झाले आहे. याबद्दल मोरे यांनी शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालकांचे आभार मानले आहेत. शिक्षण संचालक डॉ. पालकर यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत समायोजनाची सगळीच प्रक्रिया थांबविल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाच्या निर्णयाचा अवमान होणार नाही, याबद्दल आदेश दिले आहेत. मुंबईतील शिक्षकांना मुंबई बाहेर अतिरिक्त करणे आणि वेतन स्थगिती या दोन्ही प्रक्रिया यामुळे तूर्त थांबतील, असे पालकर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.