भाऊसाहेब फुंडकर योजनेत
सुपारी पिकाचा समावेश
मुंबईतील बैठकीत निर्णय; जिल्ह्यातील उत्पादकांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : कोकणातील सुपारी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समावेश करण्याचे आदेश राज्याचे रोहयो फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मुंबईत विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुपारी उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सुपारीचा समावेश झाला, तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत ‘दै. सकाळ’ने शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, फलोत्पादन विभागाचे उपसचिव श्रीकांत दांडगे उपस्थित होते. कोकण किनारपट्टीवर राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यांत सुपारीची लागवड मोठ्याप्रमाणात केली आहे. बाजारपेठेत वाढती मागणी असल्याने सुपारी लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. या सुपारी पिकाचा समावेश भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील १६ फळपिकांमध्ये समावेश नसल्याचे गोगावले यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले. गेल्या काही वर्षांत निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळामुळे इतर पिकांबरोबरच सुपारी पिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. निसर्ग वादळामुळे कोकणातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. कोकणातील शेतकऱ्यांची सुपारी लागवडीकरिता मागणी असूनही ज्या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत सुपारी लागवडीचा लाभ घेता येत नाही, त्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश गोगावले यांनी दिले आहेत.