जगद्गुरू रामानंदाचार्य वेद
पाठशाळेचा निकाल १०० टक्के
पाली ः नाणीजधाम येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या आद्य जगद्गुरू रामानंदचार्य वेदपाठशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. २०२४ ते २५ या शैक्षणिक वर्षांमध्ये वेदपाठशाळेच्या१४ व्या बॅचचा हाय्यर डिप्लोमा इन पौरोहित्य हा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. सोहम संजय पडवळ याने ८३.२५ टक्के गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. ७५.३८ टक्के मिळवणाऱ्या समर्थ शिवराम शिंदेला द्वितीय आणि ७५ टक्के मिळालेल्या मानस चंद्रकांत पाटीलला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यावर्षीही सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी सामाजिक उपक्रमांतर्गत या वेदपाठशाळेची २०१० मध्ये निर्मिती केली. सर्व जातीच्या मुलांसाठी पौरोहित्याचे शिक्षण मोफत दिले जाते. ही वेदपाठशाळा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर या विद्यापीठाशी संलग्न आहे. आतापर्यंत येथून साडेचारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी इथे पौरोहित्य कलेचे शिक्षण घेतले आहे.
दापोलीत सुगम संगीत अभ्यासक्रम वर्ग
दापोली ः माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाच्या दापोली केंद्राला मान्यता मिळाली असून लवकरच येथे सुगम संगीत अभ्यासक्रमाला सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राचे प्रमुख निळकंठ गोखले हे आहेत. या अभ्यासक्रमात सुगम संगीताचा प्रसार व प्रचार करणे आणि विविध गीत प्रकार यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये गायन आणि वादनाची गोडी लागावी त्यांना उत्तम सादरीकरण करता यावे यासाठीचा हा अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या सुगम गीत, गायन वादनाच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांना दहावीच्या गुणांमध्ये दहा मार्क व पाच परीक्षा उत्तीर्ण झाल्यास १५ गुणांची सवलत मिळू शकते. या सुगम संगीत परीक्षांमध्ये जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख श्री. गोखले यांनी केले आहे.
जागर योजनेंतर्गत चाफवलीत कार्यशाळा
संगमेश्वर ः जागर योजनेंतर्गत चाफवली नं. १ जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत देवळे बीटची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभागाच्या योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या कार्यशाळेला देवळे बीटमधील केंद्र-देवळे, दाभोळे,वाशी तर्फे देवरुख व तुळसणी केंद्रांचे चारही प्रमुख व सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक सहभागी झालेले होते. देवळे बीटचे विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सर्व शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, बूट व पायमोजे, आरोग्य तपासणी, उपस्थिती भत्ता, सा.फु.द.पा. योजना, महत्त्वाची शासकीय परिपत्रके (समित्यांचे एकीकरण) यासोबत आनंदी शनिवार, हर घर संविधान विद्यांजली पोर्टल, समाज कल्याण शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या पाल्यांना नोकरीपूर्व शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, इतर मागासवर्गीय वर्गीय (OBC) शिष्यवृत्ती, मुलींना प्रोत्साहन भत्ता आदी योजनांची माहिती दिली.
सती चिंचघरी महाविद्यालयात आपत्तीपूर्व प्रशिक्षण
चिपळूण : सती-चिंचघरी येथील महाविद्यालयात आयोजित आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रमात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक संजय गणपतराव वरेकर यांनी एनडीआरएफच्या जवानांचे स्वागत केले. यावेळी कमांडर प्रमोद राय यांनी आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व पटवून दिले. गावातील नागरिकांनी आणि ६५० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक उपचार, बचाव कार्य, सुरक्षितस्थळी स्थलांतर, अग्निशमन उपाययोजना, जलतरण साहाय्य, इमारतींच्या दुर्घटना यासंबंधीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक एनडीआरएफ पथकाने सादर केले. यावेळी प्राध्यापक सतीश पालकर, संतोष हतनकर, महेश सावंत, एम. जी. यादव, श्वेता चव्हाण, आनंद भुवड आदी शिक्षक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.