कुणबी एल्गारचे आश्वासन ठरले पोकळ
उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे केवळ आश्वासन ; रविवारी बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : लाखो कुणबी बांधवांच्या ‘विशाल कुणबी एल्गार’ मोर्चाने सरकारला दिलेले आश्वासन केवळ ‘पोकळ’ ठरले आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात कुणबी बांधवांना आठ दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, तीन आठवडे उलटूनही या बैठकीचा पत्ता नाही. यामुळे कुणबी समाजोन्नती संघ आणि सर्व संलग्न संघटनांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी (ता. २६) महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि ‘कुणबी’ नावाने मराठ्यांची ओबीसीत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ चा शासननिर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी कुणबी समाजोन्नती संघ, जिजाऊ संघटना, बळीराज सेना, कुणबी सेना, ओबीसी जनमोर्चा यांसह अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात विराट मोर्चा काढण्यात आला होता. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरसह कोकणातील लाखोंच्या संख्येने कुणबी बांधव या एल्गारमध्ये सहभागी झाले होते. त्या वेळी शिष्टमंडळाला सामोरे जाताना मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारले आणि अवघ्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत प्रश्न सोडवण्यासाठी बैठक लावण्याचे ठोस आश्वासन दिले होते; मात्र, आज तीन आठवडे झाले तरी बैठकीची कोणतीही माहिती नाही. याबद्दल कुणबी बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत हा सरळसरळ कुणबी बांधवांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप कुणबी एल्गार मोर्चा, कुणबी समाजोन्नती संघाचे प्रवक्ता सुरेश भायजे यांनी केला आहे.
सरकारच्या या फसवणुकीनंतर पुढील तीव्र आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ, जिजाऊ संघटना, बळीराज सेना, कुणबी सेना, कुणबी सेवा संघ या सर्व कुणबी सामाजिक संघटनांची बैठक रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता मुलुंड येथील प्रबोधन हॉलमध्ये होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.