00819
ठाकरे गटाचा मालवण पालिकेला जाब
सुरक्षा साहित्याचा प्रश्न; प्रशासनाच्या उदासीनतेबाबत संताप
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेली स्वयंचलित ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ मालवण नगरपालिकेत धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर किनारपट्टीवर नियुक्त जीवरक्षकांनाही आवश्यक सुरक्षा साहित्य नसल्याबद्दल संतप्त झालेल्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालिकेत धडक देत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दोन दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोबोटिक वॉटर क्राफ्ट पालिकेत पडून असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. दिवाळी सुट्यांमध्ये किनारपट्टी भागात पर्यटकांची गर्दी होत असल्याने ही आधुनिक सुविधा तातडीने किनाऱ्यावर उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते; मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
यातच शनिवारी (ता. २५) चिवला बीच समोरील समुद्रात चार स्थानिक मुली बुडत असल्याचे पर्यटकांना दिसले. पर्यटकांनी तत्काळ स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना माहिती दिल्यावर त्यांनी या चारही मुलींना वाचविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे पालिकेचा पर्यटकांच्या सुरक्षेबाबत असलेला अक्षम्य दुर्लक्षपणा दिसून आला.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिकेत धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी ‘स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ का सेवेत दिली नाही? जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे का? असे प्रश्न केले. यावर प्रशासनाने चिवला तसेच बंदर जेटी ते दांडी या भागासाठी दोन जीवरक्षकांची नियुक्ती केल्याचे सांगितले.
जीवरक्षकांच्या नियुक्तीवर समाधान न मानता पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला. यात या जीवरक्षकांना त्यांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट, पर्यटकांना वाचविण्यासाठी आवश्यक रिंग बोया, दोरी, कपडे, ओळखपत्र दिले आहे का? तसेच या जीवरक्षकांचा विमा उतरविला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. याबाबतची कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाने केली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने पदाधिकारी अधिकच संतप्त झाले.
संतप्त पदाधिकाऱ्यांनी, या सर्व बाबींची तत्काळ पूर्तता करावी तसेच किनारपट्टी भागात आणखी दोन जीवरक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. यानुसार पालिकेच्या अधिकारी संध्या गवळी यांनी याची कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. प्रशासनाने तातडीने संबंधित जीवरक्षकांना आवश्यक साहित्य तसेच स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट सुपूर्द केले. नितीन वाळके यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, अन्वय प्रभू, गौरव वेर्लेकर, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, तपस्वी मयेकर, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, रवी मिटकर, सिद्धेश मांजरेकर, अक्षय भोसले, दीपा शिंदे, विद्या फर्नांडिस, पालिकेच्या अधिकारी संध्या गवळी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.