गावच्या मालका .........लोगो
(१९ ऑक्टोबर पान ६)
एक दिवस धोंडू आमच्या घरी आला तेव्हा मी त्याची मुलाखत घेतली त्याच्या परदेशवारीबाबत. आम्हीही मुंबईच्या म्होरं कधी गेलेलोच नव्हतो ना म्हणून परदेशवारीचे मोठे अप्रूप आम्हाला. धोंड्या तसा तरणाबांड, विशी-बावीशीचा, हाडापेराने मजबूत; पण मस्कतला दोन वर्षे काढल्याने खरपूस भाजल्यासारखी कातडी झालेला अन् जरा भाव खात असल्याने गाववाल्यांना येडे समजणारा. मनगटावर सीको-५ घड्याळ बांधणारा मात्र वाजले किती विचारले तर हात पुढे करून तुम्हीच बघा किती वाजले ते, नी मलाही सांगा असे निरागसतेने सांगणारा.
-rat१p९.jpg-
25O01765
--अप्पा पाध्ये गोळवलकर, गोळवली, संगमेश्वर
---
बेड्यातल्या आंब्यापरीस
मोटं बीटाचं झाड
सत्तरच्या दशकात मध्यपूर्वेत विकासकामे जोरात सुरू झाली होती. अरबांकडे प्रचंड पेट्रोडॉलर्स होते; मात्र वाळवंट अन् विषम तापमान यामुळे तेथील स्थानिक बेदुइन वगैरे मागास लोक कष्टाची कामे करत नव्हते अन् त्या अरबांना फारसं डोकं नसल्याने अन् आधुनिक शिक्षणाचा अभाव असल्याने कुशल अन् अकुशल मजुरांची वानवाच होती. त्या वेळी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स आदी देशातील मजूर तिकडे जाऊ लागले. त्या कामगार भरतीची एक पद्धतही ठरलेली होती. तिथला बांधकाम ठेकेदार वा मालक भारतात यायचा अन् स्थानिक एजंटच्या मदतीने इथले मजूर अरबस्तानात घेऊन जायचा. त्या काळी असे परदेशात मजुरीला जाणे धोकादायक समजत असत. मग तो एजंट इथल्या मजुराला पाच-दहा हजार द्यायचा शिवाय पासपोर्ट, व्हिसावगैरे सारे सोपस्कार तोच करायचा अर्थात् त्या अरबाकडून चौपट पैसे घेऊनच; मात्र हे जे मजूर तिकडे जात त्यांना कमीत कमी दोन वर्षे मायदेशी येता येत नसे शिवाय अरबस्तानात पोहोचल्यावर त्यांचा पासपोर्ट तो अरब मालक स्वत:च्या ताब्यात घेत असे. तिथे दिवसा प्रचंड उकाडा अन् रात्री हाडं फोडणारी थंडी अशा हवामानात हे मजूर काम करत. १०-२० मजूर एकत्र राहत अन् जेवणही एकत्रच रांधत. अशातच एक एजंट आमच्या गावात आला अन् गावातील १५-२० मजुरांना मस्कतला पाठवून दिले. पुढील दोन वर्षात या मजुरांची कुटुंबे बऱ्यापैकी सुखवस्तू झाली; मात्र आळशी झाली असो.
दोन वर्षांनी सारे परत आले मस्कतवरून. दोन महिन्यांची रजा संपवून बहुतांश मजूर परत गेले; पण त्यातील दोन-चारजण काही खरी काही, खोटी कारणे दाखवून गावातच राहिले, त्यातीलच एक धोंडू. एक दिवस धोंडू आमच्या घरी आला तेव्हा मी त्याची मुलाखत घेतली त्याच्या परदेशवारीबाबत. आम्हीही मुंबईच्या म्होरं कधी गेलेलोच नव्हतो ना म्हणून परदेशवारीचे मोठे अप्रूप आम्हाला. त्याला विचारले, अरे धोंडू तिकडे पाऊस पडतो काय? तशी म्हणतो, अवो गुदस्ता वाइच शिपूर शिपू पडलीला मंग नाय अजिबात. अवो तिकडे ऊन असं हाय की चार घटकाभर मानूस उबा ऱ्हायलाना त झो श्याप तेची खारीक होन जाईल. ना रातीची ठंडी काय इच्यारताव? अवो चार-चार कांबरूना घेतलीव ना तरी उबारा येत नाय. मी ओळखले की, हा जास्तच थापा मारतोय म्हणून त्याला खिंडित गाठला नी विचारले, अरे पण तिकडे म्हावरं, मटन, भाजीपाला मिळतो काय रे? लगेच म्हणाला, अवो अपानू हितं जे मिळतं ना ते सगलं थत मिलतं. मला जरा त्याची खेचायची लहर आली म्हणून त्याने कधीही न बघितलेली अन् खाल्लेली अशी भाजी म्हणजे बीटरूट. म्हणून त्याला विचारले, अरे धोंडोबा तिकडे बीट मिळतो का रे, तसा म्हणतो कसा अवो टरकानी भेटतो. तिकडं झाडाचं हायेत बिटाची. म्हटलं केव्हढं असते रे बिटाचे झाड? तसा आमच्या पडवीच्या रेज्यांतून बाहेर बघत म्हणतो, हा तुमच्या बेड्यातला आंबा हाय ना त्याच्यान मोटं असतेय. वर पासाजन चढून फलां काडतात. हे ऐकून मी बेशुद्ध पडायचाच बाकी राहिलो.
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.