swt2517.jpg
06628
कणकवली : येथील प्रचारसभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार निलेश राणे, संदेश पारकर, सतीश सावंत, संजय आंग्रे उपस्थित होते.
कमान न सांभाळणारे विकास काय करणार?
उदय सामंतः कणकवलीची जबाबदारी निलेश राणेंकडे
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ः ज्यांना स्वागत कमान नीट सांभाळता येत नाही, ते कणकवलीचा विकास काय करणार? अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील प्रचार सभेत केली. कणकवलीच्या विकासाची जबाबदार आमदार निलेश राणे यांनी स्वीकारली आहे. नगरविकास विभागाकडून शहरासाठी निधी येईल. पण, नुसता निधी येऊन उपयोग नाही तर विकास कामांना कोण न्याय मिळवून देऊ शकतो? हे कणकवलीकरांनी लक्षात ठेवावे आणि आपले लोकप्रतिनिधी निवडावेत, असेही ते म्हणाले.
येथील कांबळेगल्ली येथे शहर विकास आघाडीची सभा झाली. यात श्री. सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार निलेश राणे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर, शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, ठाकरे शिवसेना विधानसभा संघटक सतीश सावंत, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘कणकवलीत येत असताना स्वागत कमान पाहिली, यात अनेक अक्षरे गायब आहेत. नेमक काय लिहिलंय तेच कळत नाही. जर नगरपंचायतीचे सत्ताधारी स्वागताची कमान नीट तयार करू शकत नसतील तर ते शहराचा कारभार कसा पाहत असतील, हे लक्षात येते. अशा लोकांच्या हातात सत्ता देऊन शहराचा विकास होणार नाही. निधी येऊन उपयोग नाही तर विकास कामांना न्याय देणारे लोकप्रतिनिधी कणकवलीवासीयांनी निवडून द्यायला हवेत.’’
आमदार नितेश राणे म्हणाले, ‘‘कणकवली नगरपंचायतीमध्ये पैशांची देवाण-घेवाण करणारे लोकप्रतिनिधी नकोत तर जनतेची कामे चुटकीसरशी करणारे जनतेचे सेवक हवे आहेत. कुणाची तरी अडवणूक करण्यासाठी, कामे थांबविण्यासाठी नगरपंचायत नाही तर वेगाने आणि एक रूपया न घेता जनतेची कामे व्हायला हवीत. शहर विकास आघाडीची सत्ता नगरपंचायतीवर आल्यानंतर आम्ही पारदर्शक कारभार करून दाखवणार आहोत. त्यासाठी यंदा बदल घडवायचा आहे. कणकवली नगरपंचायतीची इमारत पाहिल्यानंतर इमारतीचा काय दर्जा आहे हे लक्षात आला. यापेक्षा मालवण, वेंगुर्ले नगरपालिका इमारती कितीतरी चांगल्या दर्जाच्या आहेत. तसेच चांगले काम आम्हाला कणकवलीत उभे करायचे आहे.’’
यावेळी सतीश सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनीही शहर विकासाबाबत आपले मनोगत मांडले.
चौकट
विजयाचा गुलाल मीच उधळणार
कणकवलीत यंदा निश्चितपणे बदल होणार आहे. शहरात कुठल्या तारखेला काय होणार? याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी देखील कणकवलीच्या प्रत्येक प्रभागामध्ये फिल्डींग लावली आहे. त्यामुळे आघाडीचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील तर नगराध्यक्षपदी संदेश पारकर हेच निवडून येणार असून त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मी स्वत: कणकवलीत येणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.
-----------------
swt2518.jpg
06629
कणकवली ः शहरातील बिजलीनगर येथील प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री नितेश राणे. बाजूला समीर नलावडे, बंडू हर्णे, आर्या राणे.
कणकवलीत रोजगाराभिमुख उपक्रम राबवणार
नीतेश राणेः शहरातील विविध प्रभागात प्रचार सभांचा धडाका
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ः शहरात मागील पाच वर्षांत रस्त्यांचे जाळे आम्ही निर्माण केले. पुढील वर्षभरात रिंगरोडचा टप्पा पूर्ण होईल. त्याबरोबर कणकवलीतील तरुणांना रोजगार मिळेल, असे उपक्रम राबवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
येथील नगरपंचायतीमधील प्रभाग १३ मधील उमेदवार बंडू हर्णे, प्रभाग १० मधील उमेदवार मेघा सावंत आणि प्रभाग ८ मधील उमेदवार गौतम खुडकर यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री राणे यांनी प्रचार बैठका घेतल्या. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, महेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक अभय राणे, आर्या राणे आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘महामार्ग चौपदरीकरणावेळी कणकवली शहरातून उड्डाणपूल झाला. त्याचा शहर बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार, ही बाब आमच्या लक्षात आली. त्यामुळे शहराचे महत्त्व अबाधित राहावे, यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोदार स्कूल कणकवलीत आणले. जानवली नदीकाठी कृत्रिम धबधब्याची उभारणी केली. अद्ययावत क्रीडा संकुलाची उभारणी केली.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘कणकवली शहरात आता रोजगार निर्माण होणारे उद्योग व्यवसाय यावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायत निकालानंतर आमची सत्ता येताच त्याबाबतचा आराखडाही तयार केला जाणार आहे. याबरोबरच अजूनही ज्या प्रभागात रस्त्यांच्या समस्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.’’
यावेळी समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी गेल्या पाच वर्षांत कणकवली शहरात राबविलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. तसेच आजवर जशी मतदारांनी राणेंना आणि आम्हाला साथ दिली, तशीच साथ या निवडणुकीतही हवी, असे आवाहन केले.
चौकट
नळयोजनेचा नवा आरखडा राज्याकडे
शहराचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने नवीन नळयोजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठीचा आराखडा राज्याकडे पाठविण्यात आला आहे. निवडणुका संपताच त्याला मान्यता मिळणार आहे. पाणी योजना सक्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर भुयारी गटार योजनाही शहरात कार्यान्वित करणार आहोत, असे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.