09446
जलसंधारणासाठी ‘एनसीसी’चे एक पाऊल
उगवाई नदीवर श्रमदानातून बंधारा; फोंडाघाट महाविद्यालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ ः फोंडाघाट (ता.कणकवली) येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उगवाई नदीवर श्रमदानातून बंधाऱ्याची उभारणी केली. या बंधाऱ्यामुळे भुजलपातळीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर जलसंधारण, शेतीसाठी पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने हा बंधारा महत्वपूर्ण ठरणार आहे.
या बंधाऱ्याच्या उभारणीनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच डॉ. सतीश कामत आणि डॉ. बालाजी सुरवसे यांनीही विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवेचे अभिनंदन केले. बंधारा उभारणीवेळी एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. ताडेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाण्याचे संवर्धन ही केवळ गरज नसून सामाजिक लढाई असल्याचे स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी फोंडाघाट ग्रामपंचायतीने सहकार्य केले. तर सरपंच संजना संजय आग्रे यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी फोंडाघाट ग्रामपंचायत आणि नीलेश गोवेकर यांनी बंधाऱ्यासाठी साधनसामग्रीची व्यवस्था केली. सिनियर अंडर कॅडेट ऑफिसर कॅडेट कोमल जोईल हिने आभार मानले.