राज्य नाट्यस्पर्धा---लोगो
rat9p4.jpg-
09478
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत सुमती थिएटर्स या संस्थेने सादर केलेल्या नमान या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळः सकाळ छायाचित्रसेवा)
--------------
संस्कृती, लोककलेत रंगलेले नाटक ‘नमान’
सुमती थिएटरचा यशस्वी प्रय़त्न ; रसिकांचा भरभरून प्रतिसाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः कोकणी माणूस हा मुळातच कलाप्रेमी. नमन, जाखडी, दशावतार, भजन अशा अनेक लोककला इथं कोकणी माणसाच्या रक्तात वाहतात; पण अलीकडच्या काळात आधुनिकीकरणाच्या नादात या लोककलांचा ऱ्हास होत आहे. अनेक लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यावर लेखक-दिग्दर्शक चंद्रशेखर मुळ्ये यांनी ''नमान'' या संहितेतून प्रकाश टाकला. राज्य नाट्यस्पर्धेत सुमती थिएटर्स-रत्नागिरी या संस्थने २९ कलाकारांच्या संचात हा प्रयोग सादर केला. हे नाटक प्रामुख्याने कोकणातील पारंपरिक नमन या लोककलेवर आणि आजच्या स्थितीवर भाष्य करते. या नाटकात नमन करणाऱ्या एका गावातील एका तरुण नमन कलाकाराची प्रेमकहाणी आणि लोप पावत जाणारी कोकणी संस्कृती रंगमंचावर मांडण्यात आली.
----------
काय आहे नाटक 0
गावातील गावकराचं घर, घराजवळील पार, गावातील मंडळी आणि गावातील दैनंदिन व्यवहाराची लगबग.. असे सुंदर दृश्य नमान नाटकातून उभं केलं आहे. तात्या-बबन हे नमनातील पूर्वीचे सहकारी. गावातील येश्या वाढदिवसानिमित्ताने गावात लावणीचा कार्यक्रम ठेवतो. लावणीच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या बाईचा हात पकडल्यामुळे खून होतो. त्या वेळी वेडा बबन पळून जातो आणि विहिरीत पडून मरतो. बबनचा पुतण्या श्रीकांत काकाचे कार्य करण्यासाठी गावात येतो. दहाव्याच्या कार्याला पिंडाला कावळा शिवत नाही तेव्हा श्रीकांत पिंडाला वाचन देतो की, तुमची राहिलेली इच्छा मी पूर्ण करेन. तेराव्याला गावकरी बबनची पेटी उघडतात तेव्हा श्रीकांत पेटीतील सामान बघतो त्या वेळी त्याला एका मुलीचे सामान आणि काकाचा मुलीसोबतचा फोटो दिसतो. श्रीकांत तात्या गावकारांना याबाबत विचारतो. तेव्हा श्रीकांतला कळतं की, गावातल्या ठकीसोबत काकाचं प्रेम होतं. ती लग्नासाठी नमनात काम न करता मुंबईत जाऊन चांगली नोकरी करण्यास सांगत असते; पण बबन नकार देतो. तिचे लग्न होते. त्या वेळीही ती त्याला नमन की मी, असे विचारते. त्या वेळीही बबन नमन म्हणून सांगतो. इकडे नमनही बंद पडते आणि ठकीच्या प्रेमाला दिलेला नकार यामुळे बबन वेडा होतो. काकाची नमनाची इच्छा पूर्ण करण्याचे श्रीकांत ठरवतो. या गावात २० वर्षापूर्वी बंद झालेले नमन पुन्हा सुरू करायचं. गावातील गावकरी गुरव मंदिरात कौल मागतात. नमनाचा कौल पडतो. तात्या गावकार आणि श्रीकांत मोठ्या उमेदीने पुन्हा नमन सुरू करण्याचा चंग बांधतात; पण गावातील काही तरुण २० वर्षापूर्वी सुरू झालेले नमन करण्यासाठी नकार देतात. त्यांना तात्या गावकार समजवतात; पण नमनातील जुने कपडे, स्त्री पात्र कुणी करायचे व श्रीकृष्णाची भूमिका कोण करणार, हा यक्षप्रश्न निर्माण होतो. श्रीकांत आपल्या काकाच्या इच्छेसाठी नमनाचे नवीन कपडे देतो. तात्या गावकार व श्रीकांत इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या नातू परेशला श्रीकृष्णाची कथा, आपली संस्कृती-परंपरा समजावतात. तोही भूमिकेला तयार होतो. मंदिरात पालखी नाचवून मृदुंगावर थाप पडते. गावातील बंद पडलेली नमन लोककला उभी करतात. अख्खा गाव आनंदात न्हाऊन निघतो. श्रीकांत आपली संस्कृती परंपरा याबाबत गावकऱ्यांना संबोधित करतो. अशी कथा नमान या नाटकातून सादर करण्यात आली.
---------
सूत्रधार आणि साहाय
संकल्पना ः सचिन काळे, नेपथ्य ः जॉनी आपकरे, रंगभूषा ः नरेश पांचाळ, पार्श्वसंगीत ः निखिल भुते. पार्श्वसंगीत ः पंकज घाणेकर, ओंकार बंडबे, कश्मिरा सावंत. प्रकाशयोजना ः अपेक्षा सकपाळ. सुत्रधार ः लक्ष्मीकांत भाटकर. रंगमंच व्यवस्था ः राजू डाफले, श्रीधर सावंत, विशेष सहकार्य ः मोहन बापट, प्रशांत साखळकर, दुर्वेश तथा मुन्ना साळुंखे.
---------
पात्र परिचय
तात्या गावकर ः स्वप्नील धनावडे, गावकरीण काकू ः ऐश्वर्या बापट, बबन ः कुंदन सागवेकर, ठकी ः मनस्वी जाधव, श्रीकांत ः दीपक माणगांवकर, सानिका ःमुक्ता शेंबेकर, परेश ः श्रवण महाले, दिन्या ः प्रसाद सुर्वे, भिकू ः दीपेश काळे, चंदू ः साहिल तांबट, मधू ः सार्थक चव्हाण, सुशीला ः श्रावणी रावराणे, यश्या ः तन्मय डांगे, बेवडा ः आशिष सावंत, म्हादू ः अथर्व पवार, द्रुपदा ः मीना खेडकर, दादू ः श्रीमुख महाजन, गण्या ः आर्यन निकम, सावंत काका ः श्रीधर सावंत, तोतऱ्या ः तुषार गिरकर, रघू ः ऋषी कोकजे, सुभ्या ः विनय कांबळे, गुरव ः जॉनी आपकरे, फुगेवाला ः मयुर घगवे, सखू ः श्रुती पवार. इतर ः लक्ष्मीकांत भाटकर, कौशिक निवाथे, रमा कोकजे, आराध्या सुर्वे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.