सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : रायगड जिल्ह्यात आतापर्यंतच्या निवडणुका शांततेत झालेल्या आहेत. यापुढेही हीच शांतता कायम ठेवून विधानसभेसाठी कोणत्याही अडथळ्याशिवाय मतदान घेण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसह पोलिस संचलन, नाकाबंदी केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत १३ कोटी रुपयांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी जप्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. रायगड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अलिबाग-मुरूड, कर्जत-खालापूर, पेण, श्रीवर्धन, महाड, पनवेल, उरण आदी मतदारसंघ येतात. यामध्ये शहरी व ग्रामीण भागाचा समावेश असून, भौगोलिकदृष्ट्याही हद्द मोठी आहे. दरम्यान, ही निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. तीन शिफ्टमध्ये भरारी व स्थिर अशी प्रत्येकी १८ पथके कार्यरत असून, प्रत्येक पथकात तीन ते चार पोलिस अंमलदार आहेत. १३ ठिकाणी स्थिर पथकांमार्फत वाहनांची तपासणी केली जात आहे. यासह प्रतिबंधात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे.
रायगड जिल्ह्यात शस्त्र बाळगणाऱ्या १,६४९ परवानाधारकांकडून आतापर्यंत १,४२३ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. त्याचबरोबर नॉनबेलेबल वॉरंट असलेल्या १६४ पैकी १२४ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे, तर आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत चार जणांना तडीपार करण्यात आले आहे. ज्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूबंदीच्या २२६ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून आतापर्यंत २५ लाख ३० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी ११ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये २,४७४ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. याची किंमत एकूण सहा लाख २५ रुपये इतकी आहे. गुटखा वाहतूक करणाऱ्या १३ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ३ खटले रायगड पोलिसांनी दाखल केले आहेत. यात १.३ किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत अंदाजे २२ हजार ६०० रुपये इतकी आहे. त्याचबरोबर खालापूर येथे नाकाबंदी सुरू असताना ८६३.१५९ किलोग्रॅम वजनाची चांदी जप्त करण्यात आली आहे. चांदीच्या मुद्देमालासह सोन्याचे तयार दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कर्जत येथील एका फार्महाउसमध्ये कारवाई करीत चार कोटी ९४ लाखांच्या बनावट सिगारेट जप्त केल्या.
अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
भरारी पथकात, पोलिंग बूथवर नेमणूक असल्यास अथवा इतर ठिकाणी कर्तव्यावर असल्यास कशा पद्धतीने काम करावे, याचे प्रशिक्षण पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहे. आतापर्यंत ९० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
ठिकठिकाणी पोलिस संचलन
निवडणूक बंदोबस्तासाठी आयुक्तालयातील सुमारे २५० अधिकारी, तीन हजार ५०० अंमलदार तैनात राहणार आहेत. दोन बीएसएफ कंपन्याही दाखल झाल्या आहेत. त्यांच्यामार्फत २८ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस संचलन करण्यात आले. इतर ठिकाणीही पोलिस संचलन सुरू आहे.
मतदान केंद्रांची पाहणी
रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध मतदान केंद्राची जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे. केंद्रांवर आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
जिल्ह्यातील मतदान केंद्र
पनवेल - ५७४
कर्जत- ३६२
उरण - ३५५
पेण - ३८०
अलिबाग- ३७५
श्रीवर्धन - ३५१
महाड - ३९३
एकूण - २७९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.