ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बदली थांबवण्यासाठी गावकरी एकवटले
पाच्छापूर ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले शेकडो सह्यांचे निवेदन
पाली, ता. १८ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर गावात सरकारी अधिकाऱ्यांविषयी आदर प पाहायला मिळत आहे. सामान्यतः शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली जाते, मात्र येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत गावकरी त्यांच्या बदलीला विरोध करत एकवटले आहेत.
ग्रामपंचायत पाच्छापूरचे अधिकारी राहुल सुदाम कांबळे यांची बदली थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी सुधागड गटविकास अधिकाऱ्यांना शेकडो सह्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सप्टेंबर २०१९ पासून ते येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायतचे कामकाज नेहमी वेळेवर व प्रामाणिकपणे पार पाडले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कांबळे यांनी कधीही गैरहजेरी लावली नाही आणि सर्व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे लोकांची कामे वेळेत पूर्ण होत असून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मागितला नाही किंवा घेतला नाही. त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे ग्रामपंचायत रोज सुरू राहते, कोणाचेही काम अडत नाही. त्यामुळे तेच ग्रामपंचायतीत अधिकारी म्हणून राहावेत, असे ग्रामस्थांचे ठाम मत आहे.
...................
ग्रामविकास अधिकारी अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे आपले काम करत आहेत. येथील सरपंच यांच्या विरोधात अधिकाराचा गैरवापर प्रकरणी तक्रार दाखल असून ३९/१ अंतर्गत सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी काही जण दबाव आणत आहेत. जर बदली झाली तर कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची भीती आहे. म्हणूनच बदली झाल्यास सर्व ग्रामस्थ सुधागड-पाली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडतील, अशा इशारा ग्रामस्थ उमेश तांबट यांनी दिला आहे.