सेट-नेटधारकांवर गुणांकनात अन्याय
यूजीसीचे निकष डावलून जाचक पद्धत; उमेदवारांमध्ये नाराजी
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : राज्यातील होणाऱ्या प्राध्यापक भरती प्रक्रियेत सेट-नेट आणि जीआरएफधारक उमेदवारांवर कमी गुणांकन देऊन अन्याय करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी जाहीर केलेल्या निकषांनाच राज्यात बगल दिल्याने या भरती प्रक्रियेवरून सेट-नेटधारक उमेदवारांत संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील विद्यापीठे आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांत ३१ हजार १८५ पदे रिक्त असून, त्यातील केवळ ४० टक्के पदांची भरती केली जाणार आहे. यातही या भरती प्रक्रियेत २०१३ आणि त्यानंतर २०१८मध्ये यूजीसीने दिलेल्या पदभरतीसाठीच्या गुणांकन निकषांनाच डावलून नवीन गुणांकन पद्धत आणल्याने अनेकांवर ती अन्याय करणारी ठरली आहे. पीएचडी, एमफील आणि सेट-सेट आणि जेआरएफधारकांचे गुणांकन कमी केल्याने या पदभरती प्रक्रियेत ते मोठ्या प्रमाणात डावलेले जाण्याची भीती उमेदवार व्यक्त करीत आहेत. सहयोगी प्राध्यापक पदासाठी २०१८मध्ये एमफील-पीएचडीसाठी किमान गुण ३०, तर नेट-जेआरफसाठी सात, नेटसाठी तीन आणि सेटसाठी तीन असे गुणांकन होते. त्यात आता बदल करून नव्याने काढलेल्या आदेशात एमफील-पीएचडीला केवळ किमान २०, सेट-नेट-जेआरएफसाठी सहा गुण निश्चितच केले असून, २०१८च्या तुलनेते एमफील-पीएचडीत १२ आणि सेट-नेट-जेआरएफमध्ये दाेन असे तब्बल १२ गुण कमी करण्यात आले आहेत. असाच प्रकार सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांच्या गुणांकनासाठी केल्यामुळे अनेक वर्षे एमफील-पीएचडी आणि सेट-नेटसाठी अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना मोठा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच जुलै २०१८, जून २०१९ आणि सप्टेंबर २०२५ ही सहाय्यक प्राध्यापक निवडीचे निकष ठरविण्याची अखंडित मालिका सुरू असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
यूजीसीने वेळोवेळी दिलेल्या गुणांकनाच्या आदेशानुसारच फेब्रुवारी २०२५ आणि त्यापूर्वी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये प्राध्यापक भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर तत्कालीन कुलपतींनी यात बदल करून ८० आणि २० गुणांकनाप्रमाणे भरती प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. त्यात आता नवीन राज्यपाल आल्यानंतर गुणांकनात बदल करून ७५ आणि २५ असे करण्यात आले आहेत. ते बदल करताना संशोधक आणि सेट-नेट-जेआरएफधारकांचे गुण कमी करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असल्याचेही राज्यातील उमेदवारांनी सांगितले.
--
कोट
प्राध्यापक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ठरवलेली कार्यपद्धती ही पात्रताधारकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षकपदासाठी यूजीसी किंवा राज्य सरकारने घालून दिलेल्या निकषांत सेट-नेट अथवा पीएचडी हे गुणवत्तेचे प्रतीक मानले जातात; मात्र या पात्रता खऱ्या अर्थाने अध्यापन कौशल्याचे मोजमाप करतात का, हा प्रश्न विचारण्याची हीच वेळ आहे.
- प्रा. सुरेश देवढे-पाटील, नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समिती
--
वादातील गुणांकन
सहयोगी प्राध्यापक किमान गुण
एमफिल-पीएचडी : १८ गुण (पूर्वी ३० होते)
सेट-नेट-जेआरएफ : ४ (पूर्वी ७ होते, आता नेटमध्ये १ने कमी केले)
--
प्राध्यापक किमान गुण
एमफिल-पीएचडी : १७ गुण
सेट-नेट-जेआरएफ : ३
--
सहाय्यक प्राध्यापक किमान गुण
एफफिल-पीएचडी - २०
जेआरएफ - ६
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.