पालिका रुग्णालयांतील
४५ टक्के जागा रिक्त
जन आरोग्य समितीची माहिती; रुग्णालयांचे खासगीकरण थांबवण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : महापालिकेच्या केईएम, शीव व नायर या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, परिसेविका, सफाई कर्मचारी, कक्ष परिचर अशी विविध कर्मचाऱ्यांची तब्बल ४५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेने रुग्णालयांचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) खासगीकरण करण्याऐवजी रिक्त पदे भरून आरोग्यसेवा बळकट करावी, असे सूचनावजा आवाहन ‘जन आरोग्य हक्क अभियान’, ‘रुग्णालये वाचवा खासगीकरण थांबवा कृती समिती’, ‘म्युनिसिपल युनियन’ आणि ‘पॅरामेडिकल युनियन’ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
मुंबई महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांतील रिक्त पदे भरल्यास रुग्णालयांमधील कर्मचारी व कामगारांवरील ताण कमी होईल; मात्र महापालिका पदभरती करण्याऐवजी पीपीपीमार्फत विकास करून त्यांचे खासगीकरण करण्याचा डाव आखत आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी सुमारे १,२०० एमबीबीएस आणि एक हजार पदव्युत्तर डॉक्टर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. या डॉक्टरांची रुग्णालयातच भरती केल्यास डॉक्टरांची पदे भरणे शक्य आहे. तरीही पालिकेकडून कंत्राटी डॉक्टरांची भरती करून सर्वसामान्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप जन आरोग्य हक्क अभियानाने केला आहे.
----
पीपीपी भागीदारीत अधिक शुल्क आकारणी
पालिकेच्या २० हून अधिक पीपीपी प्रकल्पांमुळे आरोग्यसेवेची गुणवत्ता किंवा उत्तरदायित्व वाढलेले नाही. उलट काही आउटसोर्स आयसीयूमध्ये अपात्र डॉक्टरांकडून सेवा चालवल्याचे उघड झाले. एका आयसीयूमध्ये १४९ मृत्यू झाल्यानंतर कोट्यवधींचा करार रद्द करावा लागला होता. तसेच पीपीपी निदान केंद्रांमध्ये सार्वजनिक दरांच्या तुलनेत तीन ते पंधरापट अधिक शुल्क आकारले जात असल्याचे उदाहरणही देण्यात आले. या परिषदेत डॉ. अभय शुक्ल, डॉ. कामाक्षी भाटे, अशोक जाधव, त्रिशाला कांबळे, विवेक मॉन्टेरो, बबन ठोके, शुभम कोठारी आणि गिरीश भावे यांनी मुद्दे मांडले.
-----
राजकीय पक्षांनी जाहीरनामा काढावा
पीपीपीसाठी निविदा दिलेल्या रुग्णालयांविरुद्ध व्यापक सार्वजनिक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तसेच ३० नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय परिषद आयोजित केली जाणार असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांकडून लोककेंद्री आरोग्य जाहीरनामा जाहीर करण्याची मागणी करण्यात येईल, असे ‘रुग्णालये वाचवा, खासगीकरण हटवा कृती समिती’ने जाहीर केले.
-----
केईएम रुग्णालयातील रिक्त पदे
पदनाम मंजूर पदे रिक्त पदे
प्राध्यापक १०६ ४०
सहयोगी प्राध्यापक १६८ ५०
प्रयोगशाळा सहाय्यक ३३ ३३
प्रयोगशाळा परिचर २७ १०
क्ष-किरण तंत्रज्ञ ५२ ३०
प्रयोगशाळा सहाय्यक ७२ ६१
परिचारिका ११६ १३
-----
शीव रुग्णालयातील रिक्त पदे
पदनाम मंजूर पदे रिक्त पदे
प्राध्यापक ९९ ५४
सहयोगी प्राध्यापक १३८ ४०
सहाय्यक प्राध्यापक २२५ १५३
औषधनिर्माते ४४ २३
प्रयोगशाळा सहाय्यक २३ २३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ७१ ३४
क्ष-किरण तंत्रज्ञ ४४ १९
----
नायर रुग्णालयातील रिक्त पदे
पदनाम मंजूर पदे रिक्त पदे
प्राध्यापक ७८ ३१
सहयोगी प्राध्यापक ११५ २९
सहाय्यक प्राध्यापक १८४ १३२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ६६ ३०
क्ष-किरण तंत्रज्ञ ४५ २८
परिसेविका ९९ २७
आया १९२ ६८
कक्ष परिचर ३८३ १३०
सफाई कामगार ३२५ १२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.