स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलची तपासणी
मध्य रेल्वेचा ‘स्वच्छता पंधरवडा’; २२९ ठिकाणी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेकडून विशेष अभियान ५.० अंतर्गत १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा २०२५’ साजरा करण्यात आला. या पंधरवड्यातील मुख्य भर ‘स्वच्छ आहार’ या उपक्रमावर होता. स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉल, कँटीन आणि पॅन्ट्री कारची व्यापक तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत एकूण २२९ ठिकाणी उपक्रम राबवून ३१७ खाद्य स्टॉलची तपासणी व स्वच्छता करण्यात आली. खाद्य सुरक्षा अधिकारी (एफसीओ) आणि मुख्य आरोग्य निरीक्षकांनी (सीएचआय) खाद्यपदार्थांची गुणवत्ता, पॅकेटवरील कालमर्यादा, साठवणुकीची स्थिती आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता तपासली. स्टॉलधारकांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. कर्मचारी नखे स्वच्छ व कापलेली आहेत का, हातमोजे व टोपी वापरली जात आहे का याची पडताळणी झाली.
पॅन्ट्री कारचे आकस्मिक निरीक्षण करून अन्न साठवण, कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट बिनची कार्यप्रणाली तपासण्यात आली. पॅन्ट्री कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून ते कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून मुक्त असल्याची खात्री करण्यात आली. स्वच्छ आहार, आरोग्यदायी प्रवास हा संदेश पॅम्पलेट आणि संवादातून प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात आला. मोहिमेदरम्यान ४०० हून अधिक कचरापेट्या बसविण्यात आल्या. या मोहिमेत १७,३८८ जणांनी श्रमदान केले आणि १,०४० झाडे लावली.
स्वच्छ नीर
स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, यासाठी मध्य रेल्वेने सर्व विभागांत जल गुणवत्ता तपासणीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. जलस्रोत, फिल्टर हाउस, पंपहाउस आणि जलसाठ्यांची गाळ काढून स्वच्छता करण्यात आली. अनेक स्थानकांवर पाणी जपून वापरा, नळक्षेत्र स्वच्छ ठेवा, असे फलक लावण्यात आले. एकूण ३४१ ठिकाणी मोहीम राबवून २,७८४ जलबुथांची स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छ प्रसाधन आणि पर्यावरण
रेल्वेस्थानके, कार्यालये आणि कॉलनीतील शौचालये गंधमुक्त व सुलभ राहावीत, यासाठी पर्यावरणपूरक कीटाणूनाशकांचा वापर करण्यात आला. प्रकाशव्यवस्था सुधारण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, कचरा वर्गीकरण आणि पुनर्वापर मोहिमांना चालना देण्यात आली. प्लॅस्टिक कचरा आणि कबाड हटविण्यात आले.
स्वच्छ संवाद
स्वच्छता पंधरवड्यादरम्यान ‘स्वच्छ संवाद’ उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले. २४० वेबिनारमध्ये ७,२८७ सहभागी, ३५ पेक्षा अधिक नुक्कड नाटके आणि ७८० प्रवाशांच्या प्रतिक्रिया एसएमएसद्वारे प्राप्त झाल्या.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.