मुंबई

सहायक आयुक्तावर ८० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप

CD

सहायक आयुक्ताचा कट व्यावसायिकाच्या जीवावर
८० कोटींची गुंतवणूक हडपल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
जयेश शिरसाट : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वांद्रे येथील एक पुनर्विकास प्रकल्प अडचणीत आला असून, संबंधित प्रकल्पात गुंतवणूक केल्यास वाजवी किमतीत घरे मिळतील, असा आभास निर्माण करून वरिष्ठ पोलिस, पालिका अधिकाऱ्यांसह बॉलिवूड अभिनेत्याला महापालिकेच्या एका सहायक आयुक्ताने गुंवतणूक करण्यास भाग पाडले. गैर (ब्लॅक) गुंतवणुकीची जवळपास ८० कोटींची रक्कम त्याच्या वतीने भारतीय वंशाचा ब्रिटीश व्यावसायिक निशित पटेलने स्वीकारली; मात्र सहायक आयुक्ताने आता हात वर केल्याने हे प्रकरण पटेलच्या जीवावर बेतले आहे. या प्रकरणी व्यावसायिकाने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, संबंधित सहाय्यक आयुक्ताने हे आरोप फेटाळले आहेत.
महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ताने अनेकांना पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. भविष्यात फायदा होईल, असे प्रलोभन दाखवत स्वतःच्या जबाबदारीवर या सर्वांशी साधारण दीड वर्षांपूर्वी त्याने प्रत्यक्ष चर्चा केली. यातील बहुतांश बैठका परळच्या एफ साऊथ विभाग कार्यालयात घडल्या. गुंतवणूकदार असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने तर तब्बल १५ किलो सोने आणि १.८९ कोटी रोख, तर अन्य एका अधिकाऱ्याने तब्बल आठ कोटी रुपये गुंतवले. ही रक्कम पटेल याने स्वीकारली. पटेल यांनी केलेल्या आरोपांनुसार ते या गुंतवणूकदारांना ओळखत नव्हते. विशेष म्हणजे वांद्रे येथे पुनर्विकास प्रकल्प राबविणाऱ्या विकसकास अर्थसहाय्याची आवश्यकता नव्हती; मात्र त्यास निकड असल्याचा आभास निर्माण करून या सहाय्यक आयुक्ताने सुमारे ८० कोटी रुपये गुंतवणूक स्वरूपात स्वीकारले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एकाही गुंतवणूकदाराने बांधकाम व्यावसायिकाची प्रत्यक्ष भेट न घेता, प्रकल्पाचा आराखडा, कागदपत्रे न पाहता, कोणतीही चौकशी न करता निव्वळ या सहाय्यक आयुक्ताच्या शब्दावर इतकी मोठी रक्कम गुंतवल्याचा दावा पटेल यांनी केला. या व्यवहारांत आपण फक्त ‘पोस्टमन’ म्हणून काम केल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे.
व्यवसायासाठी मी सहाय्यक आयुक्ताकडून कर्ज घेतले होते. ती मी व्याजासह वेळेत चुकवल्याने त्यांच्याशी माझा परिचय वाढला. त्यावरूनच त्याच्या सूचनेवरून वरील प्रत्येक गुंतवणूकदाराची रक्कम त्या-त्या ठिकाणी जाऊन आणली. ती त्याच दिवशी सहाय्यक आयुक्ताच्या हवाली केली; मात्र काही दिवसांनी त्याने नियोजित कटानुसार ही रक्कम मी लाटल्याचा कांगावा केला. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने पैशांसाठी माझ्याकडे तगादा लावला, असे पटेल यांनी सांगितले. पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यासह सीबीआय आणि ईडीकडे लेखी तक्रार करून न्याय मागितला आहे.
----
सहाय्यक आयुक्ताने आरोप फेटाळले
पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताशी याबाबत संपर्क साधला असता, निशित पटेल हा एजंट आहे. त्याने टीओटी (ट्रान्स्फर ऑफ टेनन्सी) ॲग्रिमेंट करून माझ्यासह सुमारे ६० जणांची फसवणूक केली. माझ्यासह सर्वांनी ही गुंतवणूक वैध मार्गाने अर्थात धनादेशाद्वारे, आरटीजीएसद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले. खातरजमेसाठी हे करार किंवा बँक व्यवहारांच्या नोंदीबाबत विचारणा केली असता सहाय्यक आयुक्ताने त्यास नकार दिला. आम्ही पटेलला कायदेशीर नोटीस पाठवू, असे मात्र त्याने स्पष्ट केले.
----
अपहरण करून खंडणीची मागणी
पटेल यांच्या तक्रारीनुसार सहाय्यक आयुक्ताने भाडोत्री गुंडांकरवी ४ ऑक्टोबरला त्यांचे अपहरण केले. खार येथील त्यांच्या कार्यालयात शासकीय अधिकारी, महिला पोलिस शिपाई, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हॉटेल व्यावसायिक आणि दोन अनोळखी बाउन्सरने बंदुकीच्या धाकाने अमानुष मारहाण केली, तसेच गोमांस खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला. तुझ्या पत्नीवर बलात्कार करू, मुलांचे हातपाय तोडू, तुला जीवे मारू, अशा धमक्या देत ६० कोटींची खंडणी मागितली.
----
बंदुकीच्या धाकात वदवून घेतले
अपहरण केल्यानंतर सहाय्यक आयुक्ताने पटेल यांचे दोन मोबाईल फोन हिसकावून घेत गुंतवणुकीच्या रकमेबाबत स्वतः दिलेल्या सूचना, ती रक्कम मिळाल्याची खात्री देणारे मेसेज, व्हॉइस रेकॉर्ड, कागदपत्रे, नोंदी इत्यादी पुरावे डिलीट केले. डोक्यावर बंदूक लावून मी या गुंतवणूकदारांना पैसे देणे लागतो, असे माझ्याकडून वदवून घेतल्याचा पटेल यांचा दावा आहे.
---
मारहाणीचे चित्रीकरण
या व्यक्तींनी दोन तास चाललेल्या छळाचा मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला. तो आपल्या मित्रांना पाठवला. मित्रांनी तो आपल्याला पाठवला, असे पटेल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हा व्हिडिओ ‘सकाळ’कडे उपलब्ध आहे.
---
मी एक सर्वसामान्य व्यावसायिक आहे. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून शहानिशा न करता एक अभिनेता, आयपीएस अधिकारी कोट्यवधी रुपये गुंतवू शकतात का? दुसरे असे की एकाही गुंतवणूकदाराने पोलिस तक्रार केलेली नाही. या सहाय्यक आयुक्ताने माझीच नव्हे तर सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.
- निशित पटेल, तक्रारदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: 'दिल्लीतील स्फोटानंतर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर'; बॉम्बशोध पथकाकडून श्वानाद्वारे मंदिर व परिसराची तपासणी

क्रिकेटसोडून दुसऱ्या खेळाकडे बघणार की नाही? जागा मिळेल तिथे स्टेटिंगचा सराव, प्रशिक्षक अन् खेळाडूंसमोर मोठी अडचण...

अभिनेता गोविंदा पडला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

दुर्दैवी घटना! 'मेढ्याचे उपनिरीक्षक संजय दिघेंचा मृत्यू'; कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा धक्का, चार महिन्यांपूर्वीच बदली..

अग्रलेख : तटबंदीला तडे

SCROLL FOR NEXT