फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी, तसेच मित्र, आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवली परिसरातील तरुणाईने फडके रोडवर गर्दी केली होती. पारंपरिक पेहराव करून तरुण, तरुणी फडके रोडवर दाखल झाले होते. यंदा फडके रोडवर ढोल-ताशा पथकांस बंदी घालण्यात आल्याने रोडवर चेंगराचेंगरीची परिस्थिती नव्हती. यामुळे प्रत्येकजण मित्र मैत्रिणीसोबत गप्पा मारत ते क्षण कॅमेऱ्यात कैद करत होते. विविध कार्यक्रमामुळे फडके रोड उत्साह, आनंद, जल्लोषाने फुलून गेला होता.
दिवाळी पहाटला फडके रोडवरील बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौकात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. गळाभेटी, हस्तांदोलन करून मित्र-मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा देत होते. गणेश मंदिर, तसेच फडके रोडवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. कलाकारांचीही कला पाहण्यासाठी तरुणाई गर्दी करत होती. सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या कुटुंबीयांसह मंडळी फडके रोडवर दाखल झाली. ज्येष्ठ मंडळी, तरुण, तरुणींच्या गणेश मंदिरासमोर गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. चिमुकली, बालगोपाळ मंडळी आकर्षक पेहरावात या आनंदात सहभागी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
दिवाळी सणाच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वाहनांची पूजा-अर्चा करण्यासाठी व त्यानंतर ते वाहन आपल्या मित्र मंडळीला दाखवण्यासाठी नवी कोरी वाहने तरुण घेऊन येत होते. फडके रोडवर वाहनांना प्रतिबंध असल्याने फडके रोडला संलग्न परिसरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली होती. फडके रोडवर मनसेच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. काही कुटुंबीयांनी आपल्या घरातील पाळीव श्वान आकर्षक पेहराव करून फडके रस्त्यावर आणले होते.
ढोल पथकांचा मोर्चा टिळक रोडकडे
फडके रोडवर ढोल-ताशा वादनाला बंदी असल्याने टिळकनगर रोडवर ढोल-ताशा पथकांची गर्दी झाली होती, तर फडके रोडवर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त डीजेचा दणदणाट सुरू होता. या वाद्याच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत आहे. आप्पा दातार चौकात गणेश मंदिर आयोजित नृत्याचे कार्यक्रम ठेवले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी फडके रोडवर पोलिस, वाहतूक पोलिस तैनात होते. अग्निशमन दलाचे वाहन सज्ज ठेवले होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील फडके रोडवर भेटल्यावर मित्रत्वातील रेशीमबंध अधिक घट्ट होतात. फडके रोडवरील भेटीतून अनेकांचे प्रेमाचे बंध अधिक घट्ट झाले, असे मानले जाते. त्यातून तरुण, तरुणींचे विवाह झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या कारणांसाठीही फडके रोडची चर्चा सर्वदूर आहे.
वडापावच्या गाड्यांवर गर्दी
आपल्या जुन्या आठवणी जागविण्यासाठी कुटुंबासह फडके रोडवर आवर्जून दाखल होतो. फडके रोडवर हजेरी लावल्यावर येथील जुन्या हाॅटेलमधील चहा-नाश्त्याची चव चाखून मगच बहुतांशी जण घरचा रस्ता धरतात. फडके रोड परिसरातील चहाच्या ठेल्यांवर चहा, काॅफी, उकाळ्यासाठी, वडापावच्या गाड्यांवर गर्दी आहे. पोलिसांनी आवाहन करूनही फटाकेविक्रेत्यांनी मात्र आपली दुकाने फडके रोडवरून हटविली नसल्याचे दृश्य होते. आचारसंहिता असल्याने राजकीय मंडळी गाजावाजा न करता आप्पा दातार चौकातील कार्यक्रमात उपस्थिती लावत काढता पाय घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.