सेनेच्या दोन्ही गटांसाठी अस्तित्वाची लढाई
कल्याण पश्चिम विधानसभेचा कानोसा
दत्ता बाठे : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : २००९ मध्ये कल्याण पश्चिम विधानभा मतदारसंघाची निर्मिती झाली, पहिल्याच निवडणुकीत शिवसेना व मनसे यांच्यातील निकरीच्या लढतीत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांचा मनसेचे प्रकाश भोईर यांनी अवघ्या पाच हजार पाचशे मतांनी पराभव केला, तर २०१४ च्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशभरात भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव होता. या वेळी भाजपने दोन दशकांतील सेना भाजपची युती तोडली. प्रत्येक पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढविल्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशी पंचरंगी लढत झाली होती. या वेळी भाजपचे नरेंद्र पवार यांनी २,२१९ मतांनी शिवसेनेचे विजय उर्फ बंड्या साळवी यांचा पराभव केला होता. दोन्हीवेळा शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास मनसे व भाजपने हिसकावून घेतला; मात्र २०१९ मध्ये शिवसेना व भाजप एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले होते. शिवसेनेने या मतदारसंघात महापालिकेत आपले सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून आल्याने दावा केला होता. त्यानंतर विश्वनाथ भोईर यांच्या रूपाने शिवसेनेने पहिल्यांदा यश मिळवले.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शिंदे गट व उद्धव ठाकरे गट, असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे; मात्र या मतदारसंघात मनसेचीदेखील ताकद आहे. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा जोमाने सर्व ताकदीने लढण्यास सज्ज झाली आहे, तर भाजपचे माजी आमदार गतनिवडणुकीत अपक्ष उभे राहिले होते. त्या वेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यंदादेखील पाच वर्षांचा जनसंपर्क आणि मतदारांच्या कामावर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे शहर अध्यक्ष आणि कॉँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे खरी लढत कोणात होते, हे ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल.
कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात महापालिका हद्दीतील उंबर्डेपासून टिटवाळा गणपती मंदिर परिसरापर्यंत ३८ प्रभाग, तसेच कल्याण तालुक्यातील ग्रामीण धील नांदप गाव, अशी भौगोलिक रचना आहे. यामध्ये जुने कल्याणमधील टिळक चौक, गांधी चौक, अहिल्याबाई चौक, दूधनाका, पारनाका, गफुर डोन चौक, घास बाजार, टिळक चौक, रामबाग, जोशीबाग, नव्याने विकसित झालेल्या रौनक सिटी, - गोदरेज हिल, खडकपाडा, फ्लावर व्हाली, भोईर वाडी, चिकणघर, योगीधाम, आदी नवे कल्याणसह उंबर्डे, सापार्डे, बारावे, टावरीपाडा, गौरीपाडा, भोईवाडा, रेतीबंदर, शहाड, वडवली, आंबिवली, मोहने, गाळेगाव, बल्याणी, मोहली, उबर्णी, मांडा, टिटवाळा आदी गावांसह विकसित झालेला रहिवासी, परिसर व कल्याण तालुक्यातील ग्रामीणमधील नांदप गाव अशी भौगोलिक रचना आहे.
मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ कल्याणच्या उल्हास नदीच्या खाडीकिनारी असलेल्या दुर्गाडी किल्ल्यापासून पत्रिपुल गोविंद वाडी ते उंबर्डे गावापासून थेट टिटवाळ्यापर्यंत, जुन्या कल्याण ते नव्याने विकसित झालेले मोठ मोठे कॉम्पलेक्स, गृहसंकुले असलेल्या उच्चभ्रू, मध्यमवर्गीय नोकरदारवर्गासह विविध जाती धर्माचे, तसेच मुस्लिमबहुल समाजवस्तीतील मतदार असलेला मतदारसंघ आहे. याठिकाणी मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
पाण्याची मुख्य समस्या
कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात पाण्याची मुख्य समस्या भेडसावत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिंग रोडचे काम ८० टक्के झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची वानवा आहे. जलनिस्सारण, मलनिस्सारण योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे क्लस्टर, डम्पिंग, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, आरक्षित भूखंडांवर होणारी अतिक्रमणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कल्याण पश्चिम मतदारांची संख्या
पुरुष मतदार : दोन लाख २८ हजार ७८८
स्त्री मतदार : दोन लाख सहा हजार १२५
इतर मतदार : १५
एकूण : चार लाख ३४ हजार ९२८
*कल्याण पश्चिम विधानसभा संघात १३७ एकूण ४४१ मतदान केंद्रे आहेत, तसेच चार सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.