प्रचाराची पूर्वतयारी!
साहित्य खरेदीसाठी कार्यकर्त्यांची बाजारात रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. उमेदवाराच्या प्रत्यक्ष प्रचाराची पूर्वतयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली असून प्रचाराचे साहित्य खरेदी करण्यासाठी लालबागच्या बाजारात कार्यकर्त्यांची रेलचेल दिसत आहे. भाजप, काँग्रेसपेक्षा मनसेने प्रचार साहित्य खरेदी करण्यावर जोर दिल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले.
दिवाळी संपल्यानंतर बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा प्रचार साहित्य विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रचार साहित्याचा सर्वांत मोठा बाजार अशी मुंबईतील लालबागच्या बाजाराची ओळख आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसे आणि इतर पक्षांची चिन्हे असलेल्या टी- शर्ट, टोपी, बिल्ले, दुपट्टा, झेंडे आणि इतर प्रचार साहित्याची निवडणूक काळात मोठी मागणी असते.
उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी यंदा प्रचार साहित्य विक्रेत्यांनी नवनवीन आकर्षक डिझाइनच्या पक्षांच्या निशाण्या असलेल्या कापडी बॅग, मोबाईल पाऊच, पर्स, मेटलची कि चेन, कागदी पताका, मेटल बॅच, कॉर्पोरेट बॅग, राजकीय पक्षांचे छोटे कटआऊट, कापडी झेंडे, टी-शर्ट, साड्या, मफलर, फेटे बाजारात विक्रीसाठी सज्ज ठेवले आहेत.
नुकसान भरून निघणार?
पक्षफुटीचा परिणाम साहित्य विक्रेत्यांच्या व्यवसायावरही झाला आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत, मात्र जुन्या प्रचार साहित्यांमध्ये टी-शर्ट, दुपट्टा व इतर प्रचार साहित्यांवर धनुष्य बाण आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. त्यामुळे जूने प्रचार साहित्य वापरता येणार नाही, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येसुद्धा दोन गट पडले आहेत. त्यामुळे जुन्या प्रचार साहित्यांमध्ये शिवसेनेसारखा घोळ झाला आहे. त्यामुळे प्रचार साहित्यांचे नुकसान झाले आहे.
मनसेकडून सर्वाधिक मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर आपले उमेदवार उभे केले आहेत. मनसेकडून प्रचार साहित्याची अधिक मागणी आहे. कार्यकर्ते आणि उमेदवारांनी प्रचार साहित्य खरेदीला सुरुवात केली आहे. इतर राजकीय पक्षांची ४ नोव्हेंबरनंतर लालबागच्या बाजारात गर्दी वाढेल, अशी आशा दुकानदार व्यक्त करत आहेत.
नवनवीन डिझाइन
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मशाल आणि तुतारीचे वेगवेगळ्या डिझाइनचे प्रचार साहित्य तयार करण्यात आले आहे, तसेच इतरही राजकीय पक्षांच्या आवडी-निवडी ओळखून स्वतः तयार केलेले नवनवीन डिझाइनचे प्रचार साहित्य बाजारात आणले आहे. यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे थ्री डी स्टिकर, सिम्बॉल जॅकेट, टी शर्ट आहे.
काही प्रमाणात ऑर्डर
मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रचार साहित्याची काही प्रमाणात ऑर्डर आली आहे, मात्र अपक्ष उमेदवारांचे जोपर्यंत चिन्ह वाटप केले जात नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून प्रचार साहित्याची मागणी होत नाही. चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचार साहित्याला मोठी मागणी वाढेल, असे येथील विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या कित्येक वर्षांपासून निवडणुकीची घोषणा होताच दुकानात एकच गर्दी उसळते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे, मात्र यंदा निवडणूक घोषित होऊन पंधरवडा उलटला तरी व्यवसायाने म्हणावा तसा जोर पकडला नाही. दिवाळीनंतर बाजारात गर्दी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
हेमंत पटेल,
मालक, श्रीराम ड्रेसवाला
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार साहित्याची मागणी होत आहे. अनेक पक्षातील कार्यकर्ते आमच्याकडे येऊन सॅम्पल घेऊन जात आहेत, परंतु पाहिजे तितकी ऑर्डर मिळालेली नाही.
- दिनेश पुरोहित,
मालक, श्री महालक्ष्मी ड्रेसवाला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.