थोडक्यात रायगड
दिव्यांग कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मारली बाजी
रोहा, ता. २५ (बातमीदार) ः अखिल भारतीय दिव्यांग कबड्डी या दोन दिवसीय स्पर्धा महाराष्ट्राच्या गाजियाबाद येथे (२१ व २२) रोजी पार पडल्या. या स्पर्धेत अंतिम विजेता महाराष्ट्र संघ ठरला आहे. संघाचा कर्णधार रायगड जिल्हाचा व रोहा तालुक्याचा वाशी गावाचा रहिवासी सहदेव शिवराम बर्डे यांनी प्रतिनिधी केले होते. तर उप कर्णधार सचिन तांडेल (पालघर), राज राठोड (नांदेड), मंगेश जाधव (रोहा), ओंकार महाडिक (माणगाव ), अमर मन्यार (कल्याण), महेश ओसावे (नदुरबार), हितेश पाटील (अलिबाग), राज राने (महाड), निलेश भाटे (नागपूर), राम कुरवाले (नागपूर) अशी टीम होती. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवींद्र सकपाळ व एनआयएस कोच बिंदूक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली टीम खेळवली गेली. तर गाजियाबाद येथे मदन हे मुख्य कोच भूमिकेत होते. या स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान अशी अंतिम थेट लढत पाहायला मिळाली. या लढतीमध्ये महाराष्ट्र संघाने पक्कडी चढायाचा नमुना पेश करीत तब्बल २४ गुणांनी राजस्थान संघावर मात करून अंतिम विजेता पद पटकावले. संघाचे नेतृत्व रोहा तालुक्यातील जय हनुमान वाशी संघाचा खेळाडू सहदेव बर्डे यांनी केले होते. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्राचा राज राठोड, उत्कृष्ट पक्कड मंगेश जाधव याला गौरवण्यात आले.
..................
विद्यार्थ्यांसाठी रेमेडी अल स्टडी प्रोग्रॅम
पेण (बातमीदार) ः करोना काळानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ढासळल्यामुळे सीएफआय व बी. एन. वाय यांच्या वतीने ग्रामीण भागात रेमेडीअल स्टडी प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यास करून घेणे व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे, हा या स्टडी प्रोग्रॅमचा मुख्य उद्देश आहे. शिवाय याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत ३५ स्टडी क्लासेस वाडीवस्ती अशा ग्रामीण भागात सुरू आहे. या कार्यक्रमाचा एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे. मुलांच्या प्रगतीबरोबरच शिक्षकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक तज्ज्ञांच्या सहाय्याने अभ्यास वर्ग घेतले जातात. त्याचा एक भाग म्हणून फेब्रुवारीत झेडपी शाळेतील शिक्षक राजेश भोईर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सोप्या पद्धतीने काशा प्रकार शिक्षण घ्यावे, हे शिकवण्यात आले.
..............
महात्मा गांधी वाचनालयात ग्रंथोत्सव
पेण (बातमीदार) ः महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयात नुकतेच ग्रंथोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. महाराष्ट्रातील वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, हा या ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सवाचे आयोजन रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयात करण्यात आले होते. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे, डॉ. अनंत देशमुख, एसएनडीटी विद्यापीठाचे प्रशांत पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक अजित पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. ग्रंथ प्रदर्शनात मराठी व इंग्रजी भाषेतील कथा, कादंबरी, चरित्र स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध होती. लेखक विलास नाईक, वर्षा कोळेकर, चारुदत्त चिखले, कैलास पिंगळे, वैभव धनावडे आदी लेखकांनी परिसंवादामध्ये भाग घेत प्रेक्षकांशी संवाद साधला. भारताचे संविधान या विषयावर आदिवासी मुलींनी पथनाट्य सादर केले.
...............................
सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ आणि रणपिसे क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने वेध भविष्याचा... शिक्षणातील संधी हा कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. तसेच शिक्षक तज्ज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती देण्यात आली. यावेळी दोनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्तेनुसार आपली पुढील दिक्षा ठरवावी, तसेच इस्त्रो आदीसाठी असंख्य सायन्स विद्यार्थ्यांची भारताला गरज आहे, आदीबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डी. एम. जाधव यांनी उत्तम नियोजन केले होते. शिवाय कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
.................
रोहा येथे तालुका बुद्धिबळ संघटनेची स्थापना
रोहा (बातमीदार) ः रोहा येथे नुकतीच तालुका बुद्धिबळ संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील बुद्धिबळ खेळाडुंना सर्वाधिक लाभ होणार आहे. रोहा तालुक्यात अनेक बुद्धिबळ खेळाडू आहेत. तसेच शालेय स्तरावरदेखील मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ स्पर्धा रोहामध्ये होत असतात. मात्र खुल्या गटातील किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा तालुक्यात होत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे रोहा तालुक्यातील काही बुद्धिबळप्रेमींनी एकत्र येऊन बुद्धिबळ संघटनेची स्थापना केली आहे. यानुसार रोहा तालुका बुद्धिबळ संघटना कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष संकेत खोत; उपाध्यक्ष अमर सलागरे, सचिव विक्रांत जाना, सहसचिव विवेक कानडे, खजिनदार महेश बामूगडे, सहखजिनदार योगेश भगत व कार्यकारिणी सदस्य विवेक कांबळे, सुधीर जंगम, अभिषेक रापते, सुनील घोलप, रवींद्र कान्हेकर, हेमंत शेडगे, प्रशांत देशमुख, महेश बटावले, आभूषण मिठागरी आहेत. दरम्यान रोहा तालुका बुद्धिबळ संघटनेला रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून मान्यता मिळाली असून रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे यांनी रोहा तालुका नुतन संघटनेस शुभेच्छा दिल्या आहेत. तर या संघटनेमार्फत १३ एप्रिल रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
......................
नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा उत्साहात
रोहा (बातमीदार) ः नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा रोहामध्ये उत्साहात पार पडला. नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगदगुरु श्रीच्या सिद्ध पादुकांसमवेत शोभा यात्रेने शिवसृष्टी मैदान रायकर पार्क ते रोहा नगरपरिषद, गौळवाडी मैदान या मार्गाने करण्यात आली. या शोभा यात्रेमध्ये कलशधारी महिला, निशाण धारी, छत्रपती संभाजी महाराज, ढोल ताशा, लेझिम, धर्मक्षेत्र देखावा, मरणोत्तर देहदान, झेंडेधारी, रक्तदान महायज्ञ, असे विविध कलापथक सहभागी झाले होते. या पादुका दर्शन सोहळा प्रसंगी नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. जगदगुरु श्रीच्या पादुकांचे आगमन, आरती, सामाजिक उपक्रम सोहळानंतर गुरुपूजन, प्रवचन, उपासक दिक्षा दर्शन, पुष्पवृष्टि असे अनेक कार्यक्रम योवेळी पार पडले. या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून दुर्बल घटक पुनर्वसन अंतर्गत गरीब आणि गरजूंना ४०० ब्लँकेट किटचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष लालता कुशवाह, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर, ओबीसी सेल रोहा तालुका अध्यक्ष अंनत थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.