प्रसाद जोशी, वसई
संस्कृतीमध्ये ज्ञान, कला, नीतीमूल्य, चालीरीती आणि वाचनाचा समावेश होतो. त्यामुळे कोणत्याही संस्कृतीमध्ये वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालघर जिल्ह्यात वाचनाची रुची निर्माण व्हावी, म्हणून विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. त्याला प्रतिसाद उत्तम मिळू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्येष्ठांपासून ते अगदी तरुणांमध्ये वाचनाची भूक वाढू लागली आहे.
पालघरमध्ये मराठी भाषादिन, साहित्य जल्लोष, साहित्य दिंडी, वाचक प्रेरणादिन, पालघर जिल्हा ग्रंथालयात दर रविवारी लेखक आपल्या भेटीला परिसंवाद, कार्यशाळा यासह सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयांत विविध उपक्रम राबवले जातात. याचबरोबर सध्या वाचक मेळाव्याला उभारी दिली जात असून अगदी ८० वर्षांवरील वाचकदेखील सहभाग घेऊ लागले आहेत, हे विशेष म्हणावे लागेल. वाचक मेळावा ग्रंथप्रदर्शन, वाचक व विद्यार्थी सत्कार, वाचन संस्कृती प्रचार व्याख्यानमाला होत आहेत, ज्यात महापालिकेतर्फे वसई पश्चिमेकडील डॉ. हेगडेवार सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय, तसेच विरार-वसई, गाव नालासोपारा सार्वजनिक वाचनालयात उपक्रम आखले गेले आहेत. यात केवळ वाचन नव्हे, तर विद्यार्थी, परीक्षार्थींना विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे त्यांना भविष्याची वाटचाल करणे अगदी सोपे होत आहे.
प्रा. डॉ. शुभम पाटील यांनी सांगितले, की वाचनालयात आपण अंतर्मुख होत असतो. मुलांना वाचनापासून दूर ठेवू नये. वाचन वेड असावे. पुस्तकाच्या पानांमध्ये आनंदाचा झरा निसर्गाचे बहिरूपी दर्शन असते. आपल्याला नजर देण्याचे काम पुस्तके करत असतात. पुस्तके, वृत्तपत्र वाचन हे समाजोपयोगी आहेत. त्यामुळे वाचनावर अपार प्रेम केले पाहिजे. फक्त शालेय जीवनात नव्हे, तर आयुष्यभर पुस्तके साथ देतात, असे वाचकप्रेमी मकरंद सावे यांनी सांगितले. वाचनसंस्कृतीला वाचनालय व ग्रंथालये संजीवनी ठरू लागली आहे. त्यामुळे विविध लेखक, कवींची पुस्तके चालून त्यातून बोध घेण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत.
एकीकडे डिजिटल युग आले तरी पालघरमध्ये पुस्तक हातात घेऊन वाचा, असा संदेश देताना, एकाच छताखाली वाचकांना प्रेरणा दिली जात असल्याने वाचनसंस्कृतीला वाव मिळू लागला असून, वाचकांकडून अशा उपक्रमाचे जोरदार स्वागत केले जात आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण ३५ ग्रंथालये आहेत. डहाणू, पालघर शहर आणि मोखाडा येथे लवकरच शासकीय ग्रंथालय होणार आहे. वाचन संस्कृती रुजवणे, हा उद्देश जिल्हा ग्रंथालय विभागाचा आहे. त्यामुळे कला संस्कृती, वाचक असा तिहेरी संगम निर्माण होईल.
- प्रशांत पाटील, अधिकारी, पालघर जिल्हा ग्रंथालय विभाग
वाचनाचा सामाजिक जीवनासह प्रत्येक कठीणप्रसंगी लाभ होतो. सभागृहात मुद्दे मांडताना किंवा समस्या मांडताना प्रभावीपणे याचा फायदा झाला, त्याचे श्रेय वाचनाला जाते. पुस्तक सोबती आहे; मात्र ही नाळ कायम जोडून ठेवा.
- किरण चेंदवणकर, माजी गटनेत्या, महापालिका
आपल्या जीवनात पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. वाचनाने संस्कार मिळतात. अनेक समारंभात गर्दी होते; मात्र वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी गर्दी होणे समाजाला दिशा देईल, याचा प्रसार हा सर्वव्यापी झाला पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत वाचन चळवळीचा मोठा सहभाग राहिला.
- दिलीप कोरे, अध्यक्ष, कोकण विभाग ग्रंथालय संघ
वसई-विरार महापालिकेने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी वाचनालये, ग्रंथालये उभारली आहेत. विविध उपक्रम, अद्ययावत सुविधा देताना अभ्यासिका केंद्र तयार केली आहेत. वाचक मेळावा, ग्रंथप्रदर्शनालादेखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त
वाचनामुळे समाजाच्या संस्कृतीची माहिती मिळते. प्रगल्भता येण्यासाठी मदत होते. तीन पातळ्यांवर वाचन संस्कृतीचा प्रसार होतो. यात शाळा, घर आणि समाज यांचा समावेश आहे. नाटकाचा पाया वाचन आहे. लेखकांची पुस्तके वाचणे, पत्रांचे वाचन यातून आपणाला नवी ऊर्जा आणि पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळते.
- विलास पागार, नाट्य दिग्दर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.