मसालाकिंग धनंजय दातार यांच्या तर्फे फुप्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संचांची भेट
मुंबई, ता. २० : प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलीटेशन सेंटरच्या वतीने श्वसन संस्थेचे आरोग्य आणि प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित करणारा कार्यक्रम शनिवारी (ता. १९) गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमांना मदतीचा हात देणारे सुप्रसिद्ध उद्योजक मसालाकिंग धनंजय दातार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. फुप्फुसाच्या विकाराने ग्रस्त; परंतु आर्थिक असहाय्यतेमुळे प्राणवायू पुरवठा उपकरणे खरेदी न करू शकणाऱ्या सहा गरजू रुग्णांना दातार यांनी स्वखर्चाने असे उपकरण संच भेट दिले.
प्रत्येक संचात घरात हवा तेव्हा प्राणवायू पुरवठा करणारे पाच ते १० लिटर्स क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर या उपकरणांचा समावेश होता. याआधी गेल्या वर्षीही आठ रुग्णांना दातार यांनी अशीच मदत केली आहे. याप्रसंगी बोलताना धनंजय दातार म्हणाले, माझ्या आईच्या अखेरच्या दिवसांत ती फुप्फुसाच्या आजाराने गलितगात्र झाली होती. श्वासोच्छवासासाठीची तिची धडपड मला बघवत नव्हती. आजही अशा आजारांनी ग्रस्त गरीब रुग्णांचे हाल मला अस्वस्थ करतात. कोरोना साथीच्या काळात तत्काळ प्राणवायू न मिळाल्याने अथवा वाहनाच्या अनुपलब्धतेमुळे रुग्णालयात वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक रुग्ण दगावले. त्यावर उपाय म्हणून मी व माझ्या समूहाने ऑक्सिजन सिलिंडरने सज्ज रिक्षा ॲम्ब्युलन्स या अभिनव उपक्रमाला आर्थिक पाठबळ पुरवले. गेल्या वर्षी आणि यंदाही पैशांअभावी प्राणवायू उपकरणे खरेदी करू न शकणाऱ्या रुग्णांना आम्ही प्राणवायू संच भेट दिले आहेत आणि यापुढेही गरीब गरजूंना अशीच मदत करीत राहणार आहोत.
फुप्फुसाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसन कार्याचा दीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. पूर्वी देवानी यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलीटेशन सेंटरचे संस्थापक चालक डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई व त्यांच्या पत्नी वैशाली प्रभुदेसाई यांनी या वेळी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. प्रभुदेसाई म्हणाले, आयुष्य आरोग्यपूर्ण घालवणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठीच सर्वांनी आरोग्य, योग्य जीवनशैली व श्वासाचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन, योग्य उपचार, नियमित व्यायाम या जोरावर फुप्फुसाच्या आजारांचे रुग्ण सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. आम्ही अशा रुग्णांचे समुपदेशन तथा यशस्वी पुनर्वसन करून त्यांना आनंदी जीवन जगायला शिकवतो.
छायाचित्र : धनंजय दातार यांनी गरजू रुग्णांना ऑक्सिजन किट दान केले.