बदलापूरकरांच्या जीवाशी खेळ!
कंपन्यांमध्ये रासायनिक धूर प्रक्रियेविना हवेत; नियमांचे उल्लंघन
मोहिनी जाधव ः सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २० ः शहरातील पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांतून दिवसाढवळ्या रासायनिक धूर हवेत सोडला जात आहे. असे असतानाही कोणत्याच कंपनीवर कारवाई होत नाही. स्थानिक प्रशासन, एमआयडीसी किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या कंपन्या बदलापूरकरांच्या जीवाशी खेळत आहेत.
बदलापूर पूर्वेकडील शिरगाव, मानकिवली, खरवई भागात एमआयडीसी क्षेत्रातील अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून निघणारा रासायनिक धूर हा प्रक्रिया, तसेच ते फिल्टर करून राहिलेला धूर हा मध्यरात्रीनंतर नळकांड्यांमधून उंचावर हवेत सोडायला हवा, असा नियम आहे; मात्र येथील अनेक कंपन्या हे सगळे नियम धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या कोणतीही फिल्टर, शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता रासायनिक धूर हवेत सोडत आहेत. पावसाळ्यात वादळीवारा आणि सतत हवा खेळती असल्याने हा वायू हवेत लगेच विरून जातो. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दिवसभरात केमिकलचा वास जाणवतो; मात्र हिवाळा किंवा उन्हाळ्याच्या तुलनेत हा वास कमी असतो. त्यामुळे पावसाळी वातावरणाचा फायदा घेत येथील अनेक कंपन्या दिवसभर रासायनिक वायू हवेत सोडत आहेत.
शिरगाव, मानकिवली, खरवई या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती, मोठमोठी गृहसंकुले आहेत; मात्र असे असतानाही या ठिकाणी कंपन्या नियम पाळत नाहीत. त्यामुळे या सगळ्याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागतो. २४ तास या परिसरात रासायनिक धूर हवेत असल्याचे जाणवत राहते. अनेकदा केमिकलची दुर्गंधी जाणवते. त्यामुळे येथील अनेक रहिवाशांना श्वसनाशी संबंधित आजार जडलेले आहेत. लाखो रुपयांचे कर्ज काढून या परिसरात घरे घेऊन राहत असलेल्या या रहिवाशांच्या जीवाची पर्वा संबंधित एमआयडीसी प्रशासनालादेखील नाही. कारण दिवसाढवळ्या या परिसरात रासायनिक धूर हवेत सोडला जात आहे. याच परिसरात एमआयडीसीचे कार्यालय, त्याचबरोबर हाकेच्या अंतरावर अग्निशमन दलाचे कार्यालय व काही अंतरावर पोलिस प्रशासन व पालिका प्रशासनाची इमारतदेखील आहे; मात्र हा सगळा प्रकार सुरू असताना कोणत्याही प्रशासनाचा कंपन्यांवर वचक नसल्याचे दिसते. अशा कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच एमआयडीसी प्रशासनाने त्वरित दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.
बदलापूर पूर्वेकडील शिरगाव, मानकिवली आणि खरवई या परिसरात मुख्यत्वे करून, एमआयडीसीच्या अनेक कंपन्या आहेत. यातील बहुतांश कंपन्या या कोणतीही फिल्टरची प्रक्रिया न करता रासायनिक वायू थेट हवेत सोडत आहेत. या तिन्ही परिसरातील लोकसंख्या सद्यस्थितीला ६० ते ७० हजार इतकी आहे. जी या रासायनिक प्रदूषणामुळे प्रभावित होत आहे. या परिसरात सतत प्रदूषित वातावरण असते. २४ तास या भागात केमिकलचा उग्र वास जाणवतो. यंदा जानेवारीपासून बदलापूर शहरातील हवा ही प्रदूषित असल्याचे गुणवत्ता निर्देशांकात दिसून येत आहे. तसेच शासनाच्या समीर या ॲपवर या परिसरातील अनेकांनी केमिकलयुक्त हवेचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात राहतो. लाखो रुपयांचे कर्ज घेऊन घर घेतले आहे. घरांचे दर महिन्याला हप्ते फेडत असताना जीव मेटाकुटीला येतो. त्यात या कंपन्यांमधून २४ तास रासायनिक धुराचा त्रास सहन करावा लागतो आणि यामुळे श्वसनासंबंधीचे आजार बळावत आहेत. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करण्यासाठी पैसे घालवावेत की घराचे हप्ते फेडण्यासाठी पैसे जमा करावेत, हेच समजत नाही. निदान प्रशासनाने आमच्या निष्पाप जीवांची काळजी तरी केली पाहिजे. या कंपन्यांवर कसलेच निर्बंध नाहीत की काय, हे चित्र दिसत आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.
- स्वप्नील पोखरकर, रहिवासी
श्वसनांचे आजार
जवळपास येथील ८० ते ८५ टक्के नागरिकांना या रासायनिक वायूमुळे श्वसनाशी संबंधित त्रास जाणवत असतो. असे नागरिक स्वतः सांगत आहेत.
प्रदूषणाचा परिणाम
बदलापूर पूर्वेकडील भागात कंपनी परिसरातच फक्त प्रदूषणाचा त्रास होत नाही, तर जवळपास या रासायनिक प्रदूषणामुळे पाच ते सहा किलोमीटरचा परिसर बाधित होतो. या ठिकाणी राहणाऱ्या अनेक रहिवाशांना, मुख्यत्वे तोंड द्यावे लागते. यात एलर्जी, दमा, सायनससारखे त्रास असणारे रुग्ण या परिसरात जास्त प्रमाणात आढळतात.
प्रभावित भाग
शिरगाव
मानकिवली
खरवई
(या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती आहे)
बदलापूर हवेचा निर्देशांक (१५ ते १९ जुलै २०२५) :
दिनांक निर्देशांक
१५ जुलै ५०
१६ जुलै ८६
१७ जुलै ६६
१८ जुलै ७२
१९ जुलै ६४
बदलापूर एमआयडीसी परिसरातील दुर्घटना
वर्ष घटना ठिकाण/कंपनी मृत्यू जखमी
२०२१ : गॅस गळती नोबेल इंटरमिडिएट्स
२०२२ : कोणतीही नोंद सापडली नाही
२०२३ : धूर/प्रदूषण नोंदी
२०२४ : स्फोट + आग माणकिवली, खरवई २ ७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.