सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० ः मालमत्ता थकबाकीवर आकारण्यात आलेला दंड पनवेल महापालिकेने ९० टक्क्यांपर्यंत माफ केला आहे. या सवलतीनंतर अवघ्या तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे नऊ कोटींपेक्षा अधिक रक्कम गोळा झाली आहे. दंड माफीच्या निर्णयानंतर १८ जुलैपासून महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. योजनेला रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, मालमत्ता कर भरण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे.
ऑक्टोबर २०१६ ला महापालिकेची स्थापना झाल्यापासून मालमत्ता कर आकारला आहे. या कर आकारण्याला अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. याबाबत उच्च न्यायालयापासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मालमत्ता कराविरोधात लढाई सुरू आहे. त्यापैकी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, महापालिकेला २०१६ ऐवजी २०२१ मार्चपासून मालमत्ता कर आकारणीचे आदेश दिले, मात्र महापालिकेने २०१६ आणि २०२१ अशा दोन्ही स्वरूपातील कर आकारून बिल पाठवले. या मालमत्ता कराच्या आकारण्यावरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवर न्यायालयाने अंतरिम निर्णय दिला आहे, मात्र अद्याप अंतिम निर्णय बाकी असल्याने बऱ्याच रहिवाशांनी मालमत्ता कर भरला नाही. त्यामुळे महापालिकेने तीन लाख ६४ हजार ३१८ मालमत्ताधारकांपैकी दोन लाख २९ हजार ९०२ मालमत्ता कर थकबाकीदारांना दंड ठोठावला. ही दंडाची रक्कम अधिक असल्याने महापालिकेचा मालमत्ता कर भरणा थांबला. अवाजवी दंड कमी करावा यासाठी विविध पक्षांनी केलेल्या आंदोलनानंतर अखेर १८ जुलैपासून महापालिकेने मालमत्ता करावर अभय योजना लागू केली आहे. योजनेनुसार महापालिकेने १८ जुलै ते २० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना ९० ते २५ टक्क्यांपर्यंत दंडाच्या रकमेत सूट दिली आहे. ही सूट लक्षात घेता, महापालिकेच्या तिजोरीत १८ ते २० जुलै या तीन दिवसांत तब्बल नऊ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. तसेच महापालिकेच्या ऑनलाइन प्रणालीवर हा आकडा वेगाने बदलत आहे.
सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू
पनवेल महापालिकेने मालमत्ता कर गोळा करण्यासाठी सर्व विभाग कार्यालये सुट्टीच्या दिवशीही खुली ठेवली आहेत. नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. खारघर, नावडे, कळंबोली, कामोठे, मोठा खांदा, पनवेल आणि महापालिका मुख्यालयात कर भरणा केंद्र सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.