श्रीवर्धनचा ‘तिसरा डोळा अधू’
८४ पैकी १९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत
श्रीवर्धन, ता. १८ (वार्ताहर) : आपत्ती काळात सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नगर परिषद हद्दीतील प्रमुख ठिकाणी ८४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यापैकी १९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने श्रीवर्धनचा तिसरा डोळा अधू झाल्याचे म्हटले जात आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्याचा पुरवठा करणे, बसविणे व कार्यान्वित करणे याकामी तब्बल एक कोटी ९३ लाख ८५ हजार ३८६ रुपयांचा निधी खर्च कण्यात आला होता. याचा लोकार्पण सोहळा हा श्रीवर्धन पोलिस ठाणे येथे १४ फेब्रुवारी रोजी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
याअंतर्गत श्रीवर्धन नगर परिषद हद्दीत प्रमुख ठिकाणी ८४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले. यामध्ये १० लाँग रेंज ॲक्सेस एएनपीआर कॅमेरे मुख्य प्रवेशद्वार, प्रमुख चौकात व समुद्रकिनाऱ्यावर बसवले होते. या तिसऱ्या डोळ्यामुळे आपत्ती काळात सुरक्षा व्यवस्था कार्यरत राहील, असे सांगण्यात आले होते. परंतु लोकार्पणानंतर काही दिवसांतच ८४ पैकी १५ कॅमेरे बंद पडले, तर चार कॅमेऱ्यांतून भुरकट प्रतिमा माॅनिटरवर दिसत आहेत. उर्वरित ६५ कॅमेऱ्यांवर सध्या श्रीवर्धनच्या सुरक्षेची धुरा आहे.
श्रीवर्धनला पर्यटन क्षेत्रात ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा पर्यटक हे चारचाकी वाहन बेदरकारपणे चालवताना दिसतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यांसह भररस्त्यावर वाहन उभे करून खरेदीसाठी जाणे, स्थानिकांशी उद्धटपणे वागणे या कारणास्तव स्थानिक विरुद्ध पर्यटक असे वादविवाद अनेकदा निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पर्यटकांच्या दोन गटांत समुद्रकिनाऱ्यावर हाणामारी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
अपुरे मनुष्यबळ
श्रीवर्धन पोलिस ठाणे येथे अपुरे मनुष्यबळ त्यातच नगर परिषदेकडून काही महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या कारणास्तव श्रीवर्धन येथील बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणे गरजेचे आहे; जेणेकरून एखादी दुर्घटना घडत असल्यास प्रशासन वेळेत घटनास्थळी दाखल होईल.
संबंधित कंपनीवर कारवाई होणार का?
नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याविषयी श्रीवर्धन नगर परिषदेचे संबंधित अभियंत्यांची चौकशी केली असता सर्व कॅमेरे व्यवस्थित सुरू आहेत, असे सांगितले असून, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत सखोल चौकशी केली असता ८४ पैकी १९ कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळाली. सहा महिन्यांतच बिघाड झालेल्या या यंत्रणेबाबतीत नगर परिषद मुख्याधिकारी विराज लबडे संबंधित कंपनीवर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.