बुद्ध धम्माचे विचार समाजाला प्रगतीपथावर नेणारे ः एल.एन. कुमारे
पेण, ता. १८ (वार्ताहर) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मात आषाढ ते अश्विन पौर्णिमा ही पवित्र मानली जात असून या तीन महिन्याच्या कालावधीत वर्षावास मालिका सुरू असते. यानिमित्ताने देशभरात होणाऱ्या प्रचार आणि प्रसारात बुद्ध धम्माचे विचार हे समाजाला प्रगतीपथावर नेणारे असल्याचे प्रतिपादन प्रा. एल.एन. कुमार यांनी अंतोरे येथे बोलताना केले. भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत पेण शाखेच्या वतीने वर्षावासाचे १३ वे पुष्प कार्यक्रम अंतोरे येथील बुद्ध विहारात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय प्रवचनकार बंडू कदम, खोपोली तालुकाध्यक्ष कृष्णा मोरे, बौद्ध महासभा पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, वंचितचे तालुका अध्यक्ष सुनील धामणकर, निवृत्त शिक्षक चंद्रकांत कोळी, प्रसाद अडसुळे, मानसी कांबळे, रोहिणी अडसुळे, नैतिक कांबळे, सचिन कांबळे, नरेश गायकवाड, सुनील शिंदे, रमेश गायकवाड, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. तर यावेळी प्रवचनकार बंडू कदम यांनी बुद्ध धम्माची तत्वे त्याचे आचरण कसे असावे, याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
..............
रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाची सभा उत्साहात
रोहा (बातमीदार) ः रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सभा रोहा तालुक्यातील रा. ग. पोटफोडे(मास्तर) विद्यालय खांब व व. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब येथे सोमवारी (ता.१६ ) रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. संघाचे अध्यक्ष सुदाम माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेप्रसंगी सेक्रेटरी विनय मार्गे, सल्लागार व्ही. व्ही. पाटील, विद्यासमिती सचिव वैशाली पाटील, सदस्य नितिन गोरिवले, सुरेश जंगम, एस. डी. कांबळे, मगर, के. एस. अंतुले, सुजीत भोसले आदी उपस्थित होते. या सभेत इतिवृत्त वाचन, कृती सत्राचा आढावा, वार्षिक सभेच्या नियंत्रणाचे नियोजन व अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
.................
शाळेला ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांकडून संगणक भेट
रोहा (बातमीदार) ः रोहा मोहल्ला विभागातील ग्रामस्थ मंडळ व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी येथील अंजुमन-ए-इस्लाम जंजिरा उर्दू हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १२ संगणक भेट स्वरूपात दिले. देणगीदारांच्या दानशूर वृत्तीने गावातील भावी पिढीचे भवितव्य उज्वल होईल, असे मनोगतदेखील कार्यक्रमाचे उद्घाटक मौलाना साद्दीक मुकादम यांनी व्यक्त केले. रोहा अंजुम उर्दू हायस्कूल येथे बुधवारी शाळेत आयोजित कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक मौलाना सादिक मुकादम, रेवा अध्यक्ष रियाज शेटे, गियासुद्दीन खान, जमील अधिकारी, मुफ्ती युसूफ देशमुख, डायमंड अध्यक्ष समीर दर्जी, मौला शेख, लियाकत सवाल, मुबीन करजिकर, बशीर डबीर, गुलाम खान आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संगणक भेट देणाऱ्या मान्यवरांचे सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन कादीर रोगे, अतिक बडे, मुख्याध्यापक साजिद शेख यांच्यासहित सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
......................
राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत आस्था थिटेलाचे यश
रोहा (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावची सुकन्या आस्था विनोद थिटे हिने राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्या वतीने ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्याचे महत्व या विषयावर इ. ७ व इ. ८ वी या गटासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपुर्ण राज्यभरातून एकूण ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तर आस्था थिटे हिने केलेले उत्तम सादरीकरण व वत्कृत्व शैलीच्या जोरावर स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे. त्याचबरोबर तिच्याबरोबर स्पर्धेत सहभागी झालेल्या दिशा दत्तात्रेय हळदे तिचाही या स्पर्धेतील सहभागाबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आस्था थिटे व दिशा हळदे या दोन्ही विद्यार्थीनी नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथील गुणवंत विद्याथी असून आतापर्यंत विविध स्तरांवरील स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली आहेत.प व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी अभिनंदन व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
................
उर्मिला पाटील ठरली पैठणीची मानकरी
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जोहेचा राजा प्रतिष्ठाच्या वतीने साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रावे येथील उर्मिला पाटील या मानाच्या पैठणीची मानकरी ठरली आहे. यावेळी त्यांचे भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड उपाध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जोहेचा राजा प्रतिष्ठान दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवित असताना, त्यांनी यापुढे रायगड जिल्ह्यातील महिलांना यात सहभागी करून घ्यावे, असे पाटील यांनी प्रतिष्ठानला आवाहन केले. यावेळी वंदना म्हात्रे, प्रीती पाटील, जोहेचा राजा प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा लता म्हात्रे, दीक्षा पेरवी, सोनल धुमाळ, स्वस्तिका बोरकर, नीलम म्हात्रे, तृप्ती पाटील आदी संख्येने महिला वर्ग उपस्थित होते. तर यावेळी आयोजित खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात विविध स्तरावर बक्षीस देण्यात आली.
.................
वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदी दिन साजरा
मुरूड (बातमीदार) : मुरूड येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, रायगड भूषण जाहीद फकजी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. विश्वास चव्हाण, तसेच कार्यक्रम संयोजक व हिंदी विभाग प्रमुख डॉ. नारायण बागुल उपस्थित होते. प्रास्ताविक करताना डॉ. नारायण बागुल यांनी १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला असल्याची माहिती दिली. आज देशातील ६० कोटींपेक्षा अधिक लोक हिंदीच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करतात, हे अधोरेखित करत त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथी जाहीद फकजी यांनी आपल्या मनोगतात संविधानातील अनुच्छेद ३४३ नुसार हिंदी ही राजभाषा असून तिची लिपी देवनागरी असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. कांबळे व डॉ. विश्वास चव्हाण यांनीही हिंदी भाषेची समृद्ध परंपरा, राष्ट्रीय ऐक्यातील योगदान आणि जागतिक स्तरावरील वाढते महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजभाषा हिंदी वक्तृत्व स्पर्धेत अरफात सिरसीकर प्रथम, अंतरा मसाल द्वितीय, तर रीदा किल्लेकर आणि अल्मिरा घारे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. काव्यवाचन स्पर्धेत राज पवार यांनी प्रथम, फिजा जामदार यांनी द्वितीय, अरफात शिरसीकर यांनी तृतीय तर अंतरा मसाल यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेप्रती आत्मीयता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.